तलवाडा : पालघर जिल्ह्याला सरकारने हागणदारी मुक्त घोषित करुन तसा पुरस्कारही प्रदान केला आहे. मात्र, विक्रमगडमध्ये शौचालय निधीत घोळ झाल्याचे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून ही हागणदारी मुक्ती फक्त कागदावरच झाली की, काय? अशी चर्चा सुरु आहे.काही दिवसापूर्वी जव्हार तालुक्यातील किरमिरा या ग्रामपंचायत शौचालय घोटाळा समोर आला होता. ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा करत आहेत. त्याच विक्रमगड तालुक्यातील उटावली ग्रामपंचायती मधील २११ शौचालयाच्या लाभार्थ्यांचे लाखो रुपये परस्पर बँकेतून काढून हडप केले असून काही मयत लाभार्थ्यांच्या नावानेही पैसे काढण्यात आले आहेत. त्यात शौचालय बांधूंनही काही लाभार्थी निधी पासून वंचित आहेत. या बाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच गटविकास अधिकारी एल. सी. पवार यांनी पाच दिवसात चौकशी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तर दूसरीकडे येत्या १५ दिवसात उटावली ग्रामपंचायती मधील घोटाळ्याची चौकशी करून १५ दिवसात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा शौचालयाचे निधी न दिलेल्या लाभार्थ्यां मार्फत विक्रमगड पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा उटावली ग्रामपंचाती मधील निधी न मिळालेल्या लाभार्थ्यांनी दिला आहे.उटावलीतील भांडाफोड झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींमध्ये असा भ्रष्टचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या आठवड्यात या तक्रारी लेखी स्वरूपात पंचायत समितीला देण्याची निधी न मिळालेल्या काही लाभार्थीनी तयारी दर्शवली आहे. त्यात अनेक ग्राम पंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या नातेवाईक व मर्जीतील लोकांनाच शौचालयाचा हा निधी दिल्याचे चित्र असून अनेक लाभार्थीची नावे यादीत नसतानाही अशांना शौचालयाचा निधी वाटप करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच ज्यांना निधी मिळालेला नाही. त्यांनी तक्रारी कराव्यात असे आवाहन पवार यानी केले आहे.उटावली ग्रामपंचायती मधील शौचालय गैरव्यवहाराच्या अनुशंगाने चौकशी अंतिम टप्यामध्ये असून येत्या पाच दिवसात या संदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकाºयांना सादर करण्यात येणार आहे.-एल. सी.पवार(बीडिओ, विक्रमगड)
शौचालय घोटाळ्याने ‘संशयकल्लोळ’, अहवाल पाच दिवसांत सादर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:14 AM