- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली समुद्र आणि खाडीकिनाऱ्यालगतच्या कांदळवनाला धोका पोहाेचत आहे. त्यामुळे पर्यावरण तसेच जैवविविधतेची मोठी हानी होते. राज्य सरकारने डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ४९४.४६४४ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाला राखीव वनांचा दर्जा देत वनविभागाकडे सुपूर्द केल्याचे २८ जानेवारीला घोषित केले. या निर्णयाने पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.कांदळवनाच्या हिरव्या भिंतीला धोका पोहाेचल्यास समुद्रकिनारी भागाचे उधाणाच्या लाटा, पुराचा जोर आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे या वनांच्या संरक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी पर्यावरणप्रेमींची होती. २८ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार मुख्य वनसंरक्षकांनी डहाणूतील वाढवण, वरोर, देदाळे, चिंचणी, वडदे, नरपड आंबेवाडी, चिखले, घोलवड, बोर्डी, डेहणे, सरावली, सावटा, आगवन, आसनगाव, माटगाव, बाडा पोखरण, चंडीगाव, कोलवली आदी गावांतील ४६३.७८४७ हेक्टर क्षेत्र आणि तलासरी तालुक्याच्या झाई या गावचे ३०.६७९७ हेक्टर क्षेत्र असे एकूण ४९४.४६४४ हेक्टर क्षेत्र राखीव वने म्हणून घोषित केली आहेत. हा सकारात्मक निर्णय असल्याने त्याचे स्वागत पर्यावरणप्रेमींनी केले आहे.वाढवण समुद्रकिनारी जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजराडहाणू : समुद्रात जाणारे घाण पाणी शुद्ध करण्यास मदत करणाऱ्या, सजीवांसाठी विपुल प्रमाणावर प्राणवायू निर्माण करणाऱ्या, पाणथळ जागेत उगवणाऱ्या तिवरांच्या झाडांचे म्हणजेच कांदळवनाचे रक्षण करण्यासाठी प्रस्ताविक वाढवण बंदर समुद्रकिनाऱ्यावर, जागतिक पाणथळ जागा दिनाचे औचित साधून वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने कांदळवनातील तिवरांच्या झाडांची ओवाळणी करून त्यांची पूजा केली. यावेळी ‘वाढवण बंदर हटवा, कांदळवन वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या जागतिक पाणथळ जागा दिनासाठी नारायण पाटील, वैभव वझे, ज्योती मेहेर, रामकृष्ण तांडेल, अनिकेत पाटील, जयप्रकाश भाय, हेमंत पाटील, पौर्णिमा मेहेर, हेमंता तामोरे, विजय विदे, अशोक पाटील, नरेंद्र पाटील आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. समुद्रकिनाऱ्यावरील पाणथळ जागेतील तिवरांच्या झाडांच्या कांदळवनामुळे समुद्राची धूप तर थांबतेच, शिवाय सजीवांना लागणारा प्राणवायू आणि खाड्यातून समुदात जाणारे घाण पाणी शुद्ध करण्याचे कार्य ही झाडे करत असतात, तसेच झाडांच्या मुळाखाली असणाऱ्या पाणथळ आणि चिखलाच्या जागेत खेकडे निवटी असे अनेक प्रकारचे लहान-मोठे मासे राहत असतात. प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे सरकार ही कांदळवने नष्ट करू पाहात आहे, ही कांदळवने वाचविण्यासाठी जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात आला.
डहाणू, तलासरीत कांदळवनांना राखीव वनक्षेत्रांचे कवच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 1:39 AM