वसई : आॅनलाईन उमेदवारी अर्ज आणि सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींमुळे पालघर जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता २३ सप्टेंबरऐवजी २६ सप्टेंबरला होणार आहे.आॅक्टोबर २०१७ मध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे त्यांच्या निवडणुका २३ सप्टेंबरला जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबरला तातडीने निर्णय घेऊन या निवडणुका २६ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले आहे.निवडणूक आयोगाने अर्ज आॅनलाईन भरण्याचे निर्देश दिले आहेत. तब्बल बारा पानी माहिती आॅनलाईन भरतांना ग्रामीण भागातील उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे, यंदापासून सरपंच थेट मतदारांमधून निवडण्यात येणार आहे. त्यासाठीही आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. पण, आयोगाच्या साईटवर सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी अर्जच उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका २६ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर करून नवा कार्यक्रम जाहिर केला आहे. ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. १२ सप्टेंबरला छाननी केली जाणार आहे. १४ सप्टेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. त्याचदिवशी दुपारी तीन नंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. तसेच अंतिम यादी जाहिर केली जाणार आहे.२६ सप्टेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. २७ सप्टेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहिर केले जाणार आहेत.
ग्रा.पं.च्या निवडणुका २३ ऐवजी २६ सप्टेंबरला , २७ ला निकाल : आॅनलाइनचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:56 AM