- शशी करपे, वसईवसई उपप्रादेशिक परिवहन खात्याला वर्षाखेरीस २११ कोटी ५९ लाख रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. मागच्या वर्षी १६१ कोटी ९९ लाखाचा महसूल मिळाला होता. यंदा ७८ हजार ९६ वाहनांची नोंदणी झाली असून त्यात ४८ हजार ८८६ मोटार सायकलींचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यात आता वाहनांची संख्या ३ लाख ७४ हजार ३१२ इतकी झाली .पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यातील वाहनांची नोंदणी विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होते. गेल्या आर्थिक वर्षात (२०१५-१६) कार्यालयात ६५ हजार १०४ वाहनांची नोंदणी होऊन १६१ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा मात्र, परिवहन कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर सर्वाधिक महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षभरात कार्यालयात ७८ हजार ९६ वाहनांची नोंदणी झाली. त्यातून २११ कोटी ५९ लाख रुपयांचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी मोटार सायकलींची सर्वाधिक ४८ हजार ८८६ इतकी नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर ९ हजार ९९४ इतक्या स्कूटर नोंदल्या गेल्या आहेत. तर २० परदेशी कंपनीच्या मोटार सायकली नोंदवल्या गेल्या आहेत. मावळत्या वर्षात ९ हजार ८२६ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. त्याचबरोबर ४६ परदेशी बनावटीच्या चारचाकी वाहनांचीही नोंदणी झाली. विशेष म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला ६ एप्रिलला आॅस्टीन मार्टीन या परदेशी कंपनीची २ कोटी ९४ लाख रुपये किंमतीची कार नोंदवली गेली. या कार्यालयात आतापर्यंत सर्वाधिक महागडी गाडी नोंदणीचा हा विक्रम झाला आहे. रिक्षा,मालवाहू वाहनांचीही नोंदणीयावेळी रिक्शा आणि कॅब-टॅक्सींचीही मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली. २ हजार ३४२ रिक्षा आणि २ हजार ३२६ टॅक्सी-कॅब नोंदवल्या गेल्या आहेत. ३ हजार ३४२ हलक्या माल वाहतूक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर १ हजार ९४२ अवजड माल वाहतूक वाहनांची नोंदणी झाली. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात ६५ हजार १०४ नवी वाहने आली होती. त्यात आता ७८ हजार ०९६ वाहनांची भर पडून जिल््हयातील वाहनांची संख्या ३ लाख ७४ हजार ३१२ इतकी झाली आहे. पालघर जिल्ह्यात वाढत्या शहरीकरणामुळे वाहन खरेदीदारांची संख्या वाढत चालली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
वसई परिवहन विभागात यंदा २११ कोटींचा महसूल
By admin | Published: April 09, 2017 1:02 AM