लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- धानिवबागच्या गांगडेपाडा या परिसरात एक रिव्हॉल्वर, सहा जीवंत काडतुसासह एका आरोपीला पेल्हार पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडले आहे. पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पेल्हार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, धानिवबागच्या गांगडेपाडा या परिसरात एक इसम त्यांच्या ताब्यात विना परवाना स्वयंमचलित अग्नीशस्त्र घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना कळविले. त्यांनी सदर बातमीची पडताळणी करणे करीता सपोनि सोपान पाटील, पोलीस हवालदार जालिंदर मुनफन, भाईदास शिंगाणे, राहुल कर्पे, अविनाश पाटील असे पथक तयार करुन त्यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले. पथकाने सापळा लावून आरोपी दिव्यांशु संदीप सिंग (२२) हा संशयास्पद हालचाली करतांना मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीमध्ये एक स्वयंचलित ५० हजार रुपये किंमतीची कानपुर बनावटीची रिव्हॉल्वर, ३ हजार रुपये किंमतीचे ६ जिवंत काडतुसे व १ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मिळुन आला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पाटील, सपोनि सोपान पाटील, पोहवा जालिंदर मुनफन,भाईदास शिंगाने, राहुल कर्पे, अविनाश पाटील यांनी कामगिरी केली आहे.
एका आरोपीला रिव्हॉल्वर व ६ जिवंत काडतुसासह पकडले आहे. गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला बुधवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - वसंत लब्दे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)