नालासोपारा : वसई पूर्वेकडील सातिवली येथील तुंगारेश्वर रोडवरील गिदराई पाडा येथे राहणाऱ्या ब्रिजलाल गौतम आणि त्यांच्या पत्नीवर रिक्षाचालक मुन्ना याने बुधवारी दारूच्या नशेत चाकू हल्ला केला. वालीव पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी गौतम पती-पत्नीला जवळच्या प्लॅटिनम रुग्णालयात भरती केले असून पतीच्या गळ्याला २२ तर पत्नीच्या गळ्याला ६ टाके घालण्यात आले आहेत. या गौतम दाम्पत्याच्या मुलीवर मुन्ना याचे एकतर्फी प्रेम आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. आरोपी मुन्ना याला शुक्रवारी अटक केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिदराई पाडा येथे राहणारे ब्रिजलाल बनवारीलाल गौतम (३६) यांच्या घरी मुन्ना हा बुधवारी संध्याकाळी गेला होता. पण ब्रिजलाल आणि त्याची पत्नी गुंजादेवी (३०) यांनी त्याला परत घरी यायचे नाही, असे सांगितले. तसेच ब्रिजलाल याने त्याला मारहाण केली आणि माझ्या मुलीसोबत बोलायचे नाही असेही बजावले. त्यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करणाºया मुन्नाला याचा राग आला आणि त्याच दिवशी रात्री दारूच्या नशेत तो पुन्हा गौतम यांच्या घरी गेला. दरवाजा उघडताच मुन्नाने धारदार चाकूने ब्रिजलाल आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि तेथून पळून गेला.वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. पोलिसांनी आरोपीची माहिती गोळा करून ज्याची रिक्षा तो चालवायचा त्याला ताब्यात घेतले.नेमक्या कारणाचा शोध सुरू- मूळचा आसाम राज्यातील मुन्ना याने मोबाइल बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना सापडत नव्हता. पण त्याने मोबाइल सुरू केला आणि पोलिसांना त्याचे लोकेशन कळले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध सुरू आहे.
रिक्षाचालकाचा दोघांवर चाकूहल्ला; एकतर्फी प्रेमातून हल्ला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:08 AM