पालघर : रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत असलेले एक ज्येष्ठ नागरिक अत्यवस्थ होतात. त्यांना उपचाराची गरज असल्याने डॉक्टर तत्काळ रुग्णालयात नेण्याची शिफारस करतात. आणि स्टेशन बाहेरच गिºहाईकांची वाट बघत असलेला रिक्षाचालक थेट फलाटावर रिक्षा आणत त्या रुग्णाला रिक्षात घालून ग्रामीण रुग्णालयात दाखल करतो. या प्रयत्नात रुग्णाचा जीव वाचतो. परंतु, विनामूल्य सेवा देणाऱ्या या रिक्षाचालकाविरोधात रिक्षा फलाटावर आणल्याने रेल्वे सुरक्षा दलाकडून गुन्हा दाखल करण्यात येतो.
मुंबई येथे राहणारे एक कुटुंब आपल्या मूळ गावी मासवण येथे गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून हे कुटुंब गुरुवारी मुंबईला जाण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहत होते. यातील ज्येष्ठ नागरिकाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याने स्थानकाशेजारीच असलेल्या ‘एक भारत स्वस्थ भारत’ या अल्पदरात मिळणाºया वैद्यकीय सेवेच्या क्लिनिकमधील नर्सने त्यांना तपासले आणि त्यांना तत्काळ रु ग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. यासाठी रुग्णवाहिकेची अत्यावश्यकता होती. मात्र, रेल्वे प्रशासन किंवा शासनाने गरिबांच्या सेवेसाठी अल्पदरात उभारलेल्या सुविधांमध्ये ही सोय उपलब्ध नव्हती. १०८ नंबरवर फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नसल्याने आणि रुग्णाला रिक्षापर्यंत नेण्यासाठी स्थानकात स्ट्रेचर अथवा व्हीलचेअर उपलब्ध न झाल्याने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी एका चिकू विक्रेत्याने स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या पिंटू श्रीवास्तव या रिक्षाचालकास मदतीसाठी हाक मारली. एका ज्येष्ठ नागरिकाच्या जीविताचा प्रश्न असल्याने श्रीवास्तवने आपली रिक्षा एक नंबर प्लॅटफॉर्मवर आणीत त्या ज्येष्ठ नागरिकास रु ग्णालयात पोहोचवत विनामूल्य सेवा दिली. मात्र, रेल्वे स्थानकावर रिक्षा आणत प्रवासाच्या दिवशी प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न या कलमाखाली रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी पिंटू श्रीवास्तव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. सध्या तो जामिनावर बाहेर असला तरी न्यायालयाला १० सप्टेंबरपर्यंत सुटी असल्याने श्रीवास्तव याला ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.मागे अशाच एका घटनेत रिक्षा चालकाने सामाजिक भान ठेवीत महिलेचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवण्यात मोलाचे कार्य केल्याप्रकरणी रेल्वे न्यायालयाने निर्दोष सोडले होते. श्रीवास्तवने ही सामाजिक जबाबदारी समजून एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचवला आहे, याची न्यायालय जरूर दखल घेईल, अशी आशा समाजसेवक अशोक चुरी यांनी व्यक्त केली.