वसई : आर्थिक विवंचनेतही केवळ मेहनतीची भाकरी खाणारे आजही आपल्या समाजात सन्मानाने जीवन जगत आहेत. अशीच एक घटना वसईतील ओमनगर भागात दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी घडली असून, प्रामाणिक रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा महागडा लॅपटाॅप त्याला परत मिळाला आहे.
वसई वाहतूक शाखेचे सहाय्यक उपपोलीस निरीक्षक तानजी चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वसईतील रिक्षाचालक रवींद्र मोहिते व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ओमनगर भागात राहणारे राजेश केशवानी यांना मोहिते यांच्या रिक्षात विसरलेला महागडा लॅपटॉप परत करण्यात यश आले आहे.
वसई रोड स्टेशन परिसरात रिक्षाचालक रवींद्र मोहिते हे रिक्षा चालवून प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करत आहेत दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी वसई अंबाडी रोड रिक्षा स्टँड येथून राजेश केशवानी हे मोहिते यांच्या रिक्षात बसले व रिक्षात पाठीमागे आपला लॅपटॉप ठेवून दिला. रिक्षात एक दुसरा प्रवासीही होता. दोघेही प्रवासी ओमनगरमध्ये उतरले. मोहिते पुन्हा स्टेशनवर आले असता रिक्षात पाठीमागे एका बॅगेत लॅपटॉप दिसला.
मोहिते यांनी वसई वाहतूक शाखेत धाव घेतली. तेथील वाहतूक विभागाचे सउपोनि तानाजी चौगुले व सउपोनि रवींद्र परब यांना समक्ष भेटून लॅपटॉप जमा केला. दरम्यान, रिक्षाचालक मोहिते यांनी दिलेल्या माहितीआधारे तत्काळ दोघा वाहतूक पोलिसांनी मोहिते यांनी ज्या दोघा प्रवाशांना ओमनगर भागात उतरवले होते तिथे चौकशी केली व काही तासांनी आपले कौशल्य सिद्ध करीत त्या लॅपटॉप मालकाचे घर गाठले. संध्याकाळी राजेश केशवानी यांना वाहतूक शाखेत बोलावून पोलिसांनी ओळख पटवली.