आशिष राणे
वसाई - निसर्गाचे ऋतुचक्र कधी व कसे फिरेल याचा काहिही नेम नाही याउलट हवामान खात्याने आधीच निर्देश दिल्यानुसार मागील दोन दिवसांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने सर्वत्र राज्यातील वातावरणावर याचा विपरीत परिणाम आता दिसू लागला आहे. अर्थातच मुंबईसह कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण सोबत रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पालघर जिल्हाचा डहाणू, पालघर व वसई तालुक्याचा पश्चिम भाग हा समुद्र किनाऱ्यावर आहे त्यानुसार येथील सर्व भागात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. दरम्यान आधीच हिवाळा व त्यात रिमझिम पाऊस व सोबत हुडहुडी भरणारी थंडी असा दुहेरी सुखद अनुभव सध्या वसईकर घेत आहेत.
परिणामी एकीकडे पाऊस व थंडी यामुळे थंडीत घातल्या जाणाऱ्या स्वेटरऐवजी आता नागरिकांना घराबाहेर पडताना छत्रीचा देखील आधार घ्यावा लागत आहे.तर दुसरीकडे शेती,वाडी करणारे नागरिक यांच्या चिंतेत भर पडली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहरात पावसाच्या सरी बरसत आहेत. आकाशात ढगाळ वातावरणासह हवेत गारवा वाढला आहे. सोबत शहरी व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सतत सुरू झाला आहे.
समुद्रात मासेमारीला फटका ; सुक्या मच्छीवर संक्रात !
रिमझिम पावसाचा फटका आता वसईतील कोळी बांधव व त्यांच्या समुद्रातील मासेमारीवर देखील बसू लागला आहे. विशेष म्हणजे मासे सुकवण्याच्या प्रक्रियेवर पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. वसई नायगाव, किल्लाबंदर ,पाचूबंदर अर्नाळा समुद्रकिनारी सुकण्यासाठी टाकलेल्या बोंबील, जवळा सारख्या सुक्या मासळीवर पावसाचे पाणी पडत असल्याने आता मासळी खराब होऊ लागली आहे.
विटभट्टी व्यावसायिकांना फटका -
किनारपट्टी आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने व अचानक आलेल्या पावसामुळे पश्चिम व पूर्व भागातील शेती ,वाडी आणि विटभट्टी व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. तर पावसाने असेच रडगाणे सुरू ठेवले तर रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची मोठी शक्यता आहे.