वाडा : कंपनी प्रशासनाने नमते घेत स्थानिकांना रोजगार व कंपनीच्या बांधकामांचे ठेके देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तिच्या गेट समोर गेले तीन दिवस सुरू असलेले आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात आले.स्थानिकांना कंपनीत ८० टक्के प्राधान्य देण्यात यावे या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आर. के. एक्सपोर्ट कंपनीच्या गेटसमोर मंगळवारपासून बेरोजगार संघर्ष समिती घोणसई मेटच्यावतीने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. या निर्णयामुळे एकच जल्लोष करीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.वाडा तालुक्यातील मेट या हद्दीत आर. के. एक्सपोर्ट ही कंपनी असून या कंपनीत शोभेच्या मण्यांचे उत्पादन घेतले जाते.गेली वीस वर्षे कंपनी येथे असून ती मध्ये स्थानिक एक कामगार वगळता उर्वरीत चारशे कामगार परप्रांतिय आहेत. याशिवाय कंपनीतील बांधकाम, वाहतूक आदी बाबतचे ठेके परप्रांतीयांनाच दिले जात असल्याने स्थानिकांवर अन्याय होत होता. तो आता दूर होणार आहे.अखेर घोणसई व मेट या दोन्ही गावातील बेरोजगार तरुण एकत्र येऊन त्यांनी बेरोजगार संघर्ष समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून कंपनीकडे पत्रव्यवहार करून स्थानिकांना ८० टक्के नोकºया, बांधकाम व वाहतूकीचे ठेके देण्याची मागणी केली. मात्र कंपनीने त्यांची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होऊन मंगळवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले. त्याने नमते घेऊन मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन संघर्ष समितीला दिले. त्यानंतर तिने आंदोलन मागे घेतले. लढ्याला यश आल्याने ग्रामस्थांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
आंदोलनाने आरके एक्स्पोर्ट नरमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:27 AM