हुसेन मेमन जव्हार : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर जव्हार तालुक्यातील दाभोसा ग्रामपंचायत हद्दीतील खरपडपाड्यात रस्ता पोहोचला आहे. आजतागायत या खरपडपाड्यात चारचाकी गाडी पोहोचलीच नव्हती. येथील नागरिकांची रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती; परंतु त्यानंतरही पाड्याला रस्त्याचे काम होत नव्हते. मात्र, वयम् चळवळीच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन या आदिवासी पाड्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रस्ता पोहोचला आहे.
पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटनस्थळ दाभोसा धबधबा असून, या पर्यटनस्थळी वर्षाकाठी हजारो पर्यटक येत असतात. याच दाभोसा ग्रामपंचायत हद्दीतील खरपडपाड्याला रस्त्याची सोय नव्हती. या पाड्यात १८ आदिवासी कुटुंबे राहत असून, एकूण १०४ लोकसंख्या आहे. मात्र, या पाड्याला आजपर्यंत रस्ताच नसल्याने, डोंगरदऱ्या चढून ग्रामपंचायत किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहोचावे लागत होते. तर रस्ताच नसल्याने वाहन तरी कुठून येणार, अशी बिकट अवस्था होती; परंतु या वर्षी खरपडपाड्याला रस्त्याचे काम सुरू झाल्याने, येथील आदिवासी कुटुंबांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अखेर त्यांना रस्ता मिळाला असून, स्वातंत्र्यात आल्यासारखे वाटत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.
स्वातंत्र्यापासून खरपडपाड्यात दळणवळणाची सोयच नसल्याने गरोदर माता, बालक, वृद्धांना, दवाखान्यात किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पायी प्रवास करीत डोंगर चढून सात कि.मी. सांबरपाडा पाट्यावर एसटी बस गाठण्यासाठी यावे लागत होते. पाड्यात रस्ताच नसल्याने, हालअपेष्टा सहन करीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामध्ये शाळकरी विद्यार्थी व गरोदर मातांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. पाड्यात रस्ता येण्यासाठी बहुतांश जमीन ही वनविभागाची होती. अखेर पंचायत समितीकडून दीड वर्षात का होईना, सर्व प्रक्रिया पूर्ण करून पाड्याला रस्ता मिळाला आहे.
रस्ता झाल्याने त्रासातून झाली सुटकाखरपडपाड्यात इ.पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा असून, या शाळेत जवळपास एकूण १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या खरपडपाड्यात रोजच येणाºया शिक्षकाला सांबरपाडा किंवा अन्य पाड्याच्या वरती वाहन ठेवून शाळेत यावे लागत होते.अंगणवाडीतील महिलांना त्यांचा आहार किंवा अन्य सामान आण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. खरपडपाड्याला रस्ताच नसल्याने, मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. मात्र, पाड्यात रस्ता झाल्याने, यातून सुुटका झाली आहे.