जव्हार : जव्हार नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. ३ मध्ये शिंदे घरापासून ते के. व्ही. हायस्कूल येथील अवघ्या चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या जोड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पहिल्या पावसातच रस्त्याची चाळण झाली असून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नगर परिषदेने आर्थिक वर्षात विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण केली असून, शहरात ठिकठिकाणी रस्ते, मोऱ्या, गटारे, संरक्षण भिंती तथा इतर विकासकामे पूर्ण केली आहेत. मात्र दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. ३ मध्ये शिंदे घरापासून ते के. व्ही. हायस्कूल जोड रस्ता तब्बल २६ लाख ९४ हजार ७९३ रुपये खर्च करून नवीन डांबरीकरण करून तयार करण्यात आला आहे. मात्र यंदाच्या पहिल्या दोन दिवस पडलेल्या धो-धो पावसात चार महिन्यांपूर्वीच तयार केलेल्या या रस्त्यावरील खडी उखडून रस्त्यावर खडी पसरली असून रस्ता पूर्ण वाहून गेला आहे.दरम्यान, अंदाजपत्रकानुसार निविदा मंजूर असूनही भेसळयुक्त आॅईल मिश्रित दर्जाहिन काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. सध्या ई-निविदा असल्यामुळे ठेकेदारांची खूपच चढाओढ असते, यात मोठी स्पर्धा होणे अपेक्षित होते, मात्र प्रशासकीय संगनमत करून सदर निविदा अंदाजपत्रकानुसार मंजूर करण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. लाखो रुपये खर्च करूनही दर्जाहिन रस्ते तयार केल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत असून रस्ता तयार करणाºया ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याबाबत ठेकेदाराला आम्ही काम निकृष्ट असल्याची नोटीस बजावली होती. ज्या ठिकाणी रस्ता उखडला आहे, तेथे नवीन पॅच मारून देण्याबाबत लेखी सांगितलेले आहे. ठेकेदाराची २ टक्के अनामत रक्कम तथा उर्वरित १५ टक्के रक्कम आमच्याकडे जमा आहे. त्यामुळे जर का ठेकेदाराने हे काम पूर्ण केले नाही तर जमा असलेल्या रक्कमेतून काम पूर्ण करून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- पी.के. जोंधळे, नगर अभियंता, जव्हार नगर परिषद, जव्हार