- आरिफ पटेलमनोर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन साकार होणाऱ्या मासवन नागझरी रस्ता पुर्णपणे उघडला असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे. या वर्षी २० जानेवारी ही या रस्त्याच्या पुर्णत्वाची तारीख होती मात्र, जागोजागी अपुर्ण काम त्यात निकृष्ट दर्जा यामुळे ५,५,८५००० कोटी निधी मंजूरीच्या या रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.पंचक्रोशीतील हजोरो नागरिकांना व विषेश करुन गरोदर महिला व रुग्णांना या रस्त्यावरुन जातांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यातच या रस्त्यावरील अनेक मोºयांचे कामही अर्धवट असल्याने ठेकेदार आर. के. सावंत यांना काळ्या यादीत का टाकू नये असा प्रश्न सागर पाटील यांनी विचारला आहे. या प्रकरणी अधीक्षक अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ठाणे कार्यालय यांना लेखी तक्रार करण्यात आली आहे.हा रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेला असून वर्क आॅर्डर व स्पेसिफिकेशन प्रमाणे काम न झाल्याचाच पुरावा आहे. डांबरापेक्षा काळ्या आॅईलचे प्रमाण अधिक तसेच खडीचे थर ठरल्या प्रमाणे न अंथरल्याने तो निकृष्ट दर्जाचा बनला आहे. दरम्यान या योजनेचे सहायक अभियंते तुषार बदानी यांनी सारवासारव करताना तेथून ओव्हर लोड गाड्या चालतात असे कारण दिले आहे. दरम्यान, रस्त्याचा दर्जा त्याच्या वापरावर आधारीत असल्याने ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.
पाच कोटींच्या रस्त्याची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:21 AM