मनोर : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असणारा दुर्वेस सावरे रस्ता पहिल्या पावसातच ठीक ठिकाणी वाहून गेला आहे. एरंबी गावाजवळ तर भर पावसात त्यावरील पुलाचे काम सुरू आहे, त्याच्या बाजूचा वळणरस्ता खचून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. लोकांचे व शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी झोपेत असल्याने ठेकेदार मातींनी खड्डे भरण्याचा काम करतो आहे.दुर्वेस ते सावरे अंतर अंदाजे अकरा किलोमीटरचे आहे त्या रस्त्यावर अनेक गाव पाडे तसेच आश्रम शाळा, जि.प. शाळा आहेत. तेथील मुले शिक्षण घेण्यासाठी पालघर मनोर वसईलाही जातात रोज मोठी रहदारी सुरू असते ११ कि.मी. रस्ता नव्याने तयार करण्यात आला असून व एरंबी गावा जवळ भर पावसात पुलाचे काम चालू आहे तात्पुरती वाहने जाण्या येण्यासाठी त्याच्या बाजूला वळण रस्ता तयार केला होता परंतु कालच्या पावसात तो खचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर काही रस्त्याचा भाग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याचे दिसत आहे रस्ता बंद असल्यामुळे तेथील प्रवाशांना तीन ते चार तास ताटकळत बसावे लागले.मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत ५ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे तेथील नागरिकांचे मत आहे. मात्र नेमलेले डेप्युटी इंजिनियर व इतर अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्हापरिषदेच्या बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनिअर तुषार बदाने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले पुलाच्या बाजूला वळणरस्ता होता तो खचला आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला तोे रस्ता ठेकेदार पुन्हा बांधून देणार कारण पाच वर्षापर्यंत त्याची जबाबदारी आहे रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. तसेच अपूर्ण काम पूर्ण करण्याचे काम जोमाने सुरू आहे. ५ कोटी ६५ लाखांचा निधी निविदे प्रमाणे मंजूर आहे. काम खूप चांगले झालेले असून जलदगतीने करण्यात आले आहे.
रस्ता गेला वाहून वळण रस्ता खचला वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:30 AM