वसई : पापडी येथील दत्तानी मॉलने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पे अॅॅण्ड पार्क सुरू केल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर वसई-विरार पालिकेने दत्तानी मॉलला सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीसाठी मोकळ्या करून स्वतंत्र पार्किंगची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. वसईतील पापडी येथील दत्तानी मॉल आता पार्किंगच्या वादात सापडला आहे. या ठिकाणच्या मंजूर आराखड्यात मॉलशेजारील रस्ता सार्वजनिक वापरासाठी आरक्षित आहे. असे असताना मॉलच्या व्यवस्थापनाने रस्ता अडवून गेट लावून टाकले. त्यानंतर त्या ठिकाणी पे अॅण्ड पार्क तयार केले. गेल्या तीन वर्षांपासून सार्वजनिक रस्ता गिळंकृत करून मॉलकडून गाड्या पार्किंगसाठी शुल्क आकारले जात असल्याची बाब काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. जिमी घोन्सालवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर त्यांनी महापालिकेला रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी नगररचना विभागाने मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. सदरचे वाहनतळ अनधिकृत असून ते तत्काळ बंद करण्यात यावे. तसेच मंजूर नकाशानुसार वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. हे प्रकरण म्हणजे रस्त्याची जागा हडप करण्याचा प्रकार आहे. (प्रतिनिधी)
सार्वजनिक रस्त्यावर पार्किंग करून लूटमार
By admin | Published: September 08, 2016 2:16 AM