लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - राजकारण सोडल्याचे सांगणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपावर आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केलेल्या भाजपाच्या नव्या जिल्हा कार्यालयाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे . मेहतांच्या कंपनीच्या गाळ्यातील कार्यालय हे जिल्हा कार्यालय म्हणून सुरूच राहील आणि म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानतच नाही अशी भूमिका मेहता समर्थकांनी घेतली आहे . रविवारी रात्री मेहतांनी एका सभागृहात समर्थकांची सभा देखील घेतली .
मीरा भाईंदर भाजपाचे एकेकाळचे सर्वेसर्वा असणाऱ्या माजी आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांची अश्लील अर्धनग्न क्लिप व्हायरल झाल्यावर तसेच बलात्काराचा आरोप झाल्यावर राजकारण आणि भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते . परंतु प्रत्यक्षात मात्र पालिका व पक्षात मेहता सक्रिय आहेत . तर त्यांची वादग्रस्त प्रतिमा , पक्ष व पालिकेत मनमानी हस्तक्षेप विरोधात भाजपच्या अनेक नगरसेवक , पदाधिकाऱ्यांनी मेहता हटाव , शहर - भाजपा बचाव अशी भूमिका घेतल्याने मेहता व त्यांचे समर्थक सुद्धा आक्रमक झाले आहेत .
त्यातूनच भाजपाचे सेव्हन स्क्वेअर शाळे बाहेरील मेहतांच्या ७११ कंपनीच्या गाळ्यात असलेल्या भाजपा जिल्हा कार्यालया ऐवजी स्वतंत्र वेगळे जिल्हा कार्यालय सुरु करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी घेतल्याने मेहता व समर्थकांत खळबळ उडाली . सदर कार्यालय व उदघाटनाचा कार्यक्रम होऊ नये तसेच जिल्हाध्यक्ष हटाव साठी मेहता यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी मध्यरात्री आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली . परंतु चव्हाण यांनी कार्यक्रम होणार असे स्पष्ट केले होते.
भाईंदर पश्चिम येथील सदर नव्या जिल्हा कार्यालयाचे उदघाटन खुद्द विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मेहता समर्थकांना विरोध असूनही कार्यक्रमास हजर रहावे लागले . फडणवीस यांनीच उदघाटन केल्या नंतर निदान नव्या जिल्हा कार्यालयाचा वाद निवळेल असे वाटत असताना रविवारी भाईंदरच्या इंद्रलोक मधील स्वातंत्र्य सैनिक कमलाकर पाटील सभागृहात मेहता यांच्या नेतृत्वा खाली समर्थकांची बैठक घेण्यात आली .
बैठकीत मेहतांच्या कंपनीच्या मालकी जागेतील कार्यालय हेच भाजपचे जिल्हा कार्यालय राहील , जिल्हाध्यक्षांनी सुरु केलेले नवीन कार्यालय आणि हेमंत म्हात्रेंना जिल्हाध्यक्षांना सुद्धा मानणार नाही अश्या स्वरूपाची आक्रमक भूमिका बैठकीत घेण्यात आली असे सूत्रांनी सांगितले .
त्यातच मेहता समर्थक असलेले यशवंत उर्फ अण्णा आशीनकर यांची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे . उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सोबतच्या संभाषणाच्या त्या क्लिप मध्ये आम्ही हेमंत म्हात्रेंना जिल्हाध्यक्ष मानतच नाही असे सांगतानाच आशीनकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचे नाव ठेऊ कि नको ठेऊ ? असे म्हटले . संघटनची व्याख्या बदलली आहे. भाजपात दोन गट झाले असून रविवारी मोठी बैठक झाली व त्यात २०० - २२५ जण होते असे आशीनकर त्यात म्हणाले आहेत .
मीरा भाईंदर भाजपा आणि पालिकेतील भाजपच्या सत्तेवर आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी मेहता व समर्थकांनी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे चित्र असून भाजपातील अंतर्गत वाद टोकाला पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे .
मधुसूदन पुरोहित ( भाजपा मंडळ अध्यक्ष , नवघर ) - नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत बैठक झाली पण ती पक्ष संघटने बाबत होती . या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही .