लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेतील ५ स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी भाजपमधील ७, शिवसेनेतील २, काँग्रेस लोकशाही आघाडीतील ५ , रिपब्लिकन (आठवले गट) २ तर अन्य १ अशा १७ जणांनी अर्ज नेले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने स्वत:ची वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु आहे.संख्याबळानुसार भाजपचे ३, शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी १ स्वीकृत नगरसेवक जाणार असून भाजप व काँग्रेसमध्ये तर इच्छुकांची जत्रा भरली आहे. त्यातही आमदार गीता जैन यांच्या शिफारशीला स्थान मिळणार की नाही ? या कडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेची निवडणूक आॅगस्ट २०१७ मध्ये होऊन अडीच वर्ष झाली. तरीही स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. ७ फेब्रु्रवारीपर्यंत भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भोसले, संजय पांगे, भगवती शर्मा, आसिफ शेख, निवृत्त पालिका अधिकारी अजित पाटील, मेहतांचे समर्थक संजय थरथरे, सोहनसिंह राजपुरोहित यांनी अर्ज नेले. पालिका निवडणुकीत भोसलेंचा पत्ता कापण्यात आल्याने ते चिडले होते. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना स्वीकृतपदाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे.म्हात्रेही मेहतांचे निकटवर्तीय आहेत. म्हात्रेंना स्वीकृत करून जिल्हाध्यक्षपद घेण्याची खेळी मेहता खेळू शकतात. आमदार गीता जैन यांच्याकडून पाटील व पांगे यांच्या नावांची शिफारस पक्षाकडे केल्याचे समजते. परंतु गटनेता व जिल्हाध्यक्ष मेहतांचे समर्थक मानले जातात. तसेच खुद्द फडणवीस यांचा वरदहस्त असल्याने जैन यांच्या शिफारशीला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून संदीप पाटील व विक्रमप्रताप सिंह या दोन्ही उपजिल्हाप्रमुखांनी उमेदवारी अर्ज नेले असले तरी सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असे दिसते. संदीप यांनी पालिका निवडणुकीत स्वत:च्या घरातच दोन उमेदवारी मिळवण्यासाठी केलेला अट्टहास, सेनेचा झालेला पराभव तसेच संघटनेसाठी त्यांचा नसलेला सक्रिय सहभाग अशी त्यांच्या बद्दलच्या नाराजीची कारणे सेनेच्या गोटातून सांगितली जातात.काँग्र्रेसमधूनही एका जागेसाठी माजी नगरसेवक प्रमोद सामंत व शफिक खान, ज्येष्ठ पदाधिकारी जवाहर शाह, प्रकाश नागणे व रवींद्र उपाध्याय यांनी अर्ज नेले आहेत.आश्वासन पाळतील याची खात्री नाहीरिपब्लिकन (आठवले गट) पक्षाकडून श्रीकांत माने व आकाश शेलेकर यांनी अर्ज नेले असले तरी भाजपकडून पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे पालन केले जाईल याची खात्री खुद्द पक्षाच्या नेत्यांनाच नाही. पालिका व विधानसभा निवडणुकीत पक्षाचा वापर करण्यासाठी स्थानिक भाजपने स्वीकृत नगरसेवक वा समिती सदस्य पद देतो असा शब्द देऊनही तो पाळलेला नाही असे सूत्रांनी सांगितले.
‘स्वीकृत’साठी धावपळ; सर्वच पक्षांत चुरस : १७ जणांनी नेले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:23 PM