डहाणू/बोर्डी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला १५ जून रोजी प्रारंभ होत आहे. याकरिता पाल्यांना लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी दुकाने आणि आठवडाबाजारांत पालकांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाईमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. उन्हाळी सुटीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक तसेच शासकीय आश्रमशाळांसाठी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होत आहे. पहिलीच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवणार आहेत. तर, गावाकडच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. शासकीय आश्रमशाळेसाठी वसतिगृहामध्ये मुलांना पाठवताना काही गोष्टी सोबत पाठवणे गरजेचे असते. किंबहुना, आपला पाल्य पहिल्यांदा शाळेत जाणार असल्याने त्याच्यासाठी शालेय वस्तूंची खरेदी काही पालक हौसेने करताना दिसत आहेत. नवीन पुस्तके, वह्या, टिफीन बॉक्स, छत्री, रेनकोट यामध्ये दरवर्षी येणाऱ्या व्हरायटीमुळे पालकवर्गाचा उडालेला गोंधळ बाजारातील संवादातून अनुभवायला येत आहे. काही टिकाऊ वस्तूंसाठी आग्रह धरणारे पालक स्वत:च्या मर्जीप्रमाणे खरेदी करताना दिसत असले तरी, काही पालक मुलांना वस्तू खरेदीचे स्वातंत्र्य देत आहे.दरम्यान, गतवर्षीपेक्षा सर्वच वस्तूंवर महागाईचा प्रभाव असून दुकानांमधून स्कूल व कॉलेज बॅगच्या किमती किमान ४०० ते ४५० रु., छत्री २५० ते ३०० रु., रेनकोट ४०० ते ४५० रु. दराने सुरू होतात. मात्र, बोर्डीतील शनिवारच्या आठवडाबाजार आणि डहाणूतील सोमवारच्या बाजारात या वस्तूंच्या किमती थोड्याफार कमी असल्याने सर्वसामान्य पालकवर्गाचा ओढा अशा बाजारांतून वस्तू खरेदी करण्याकडे दिसून येत आहे.
शालोपयोगी वस्तू खरेदीची धावपळ
By admin | Published: June 14, 2016 12:28 AM