वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदाराने ठाम नकार दिला असून ते आजारी पडले आहेत. आयुक्त निर्णय घ्यायला तयार नसल्याने आठव्या दिवशी कोणताही तोडगा न निघाल्याने बेमुदत संप सुरु ठेवण्यात आला आहे. आता संपकºयांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेतील सफाई कामगार संपावर जातील असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता संप चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या सोमवारपासून महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार संपावर गेले आहेत. बुधवारी संप मिटला होता. पण, दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी नकार दिल्याने बुधवार रात्रीपासून पुन्हा संप सुरु करण्यात आला होता. संपकरी श्रमजीवीचे पदाधिकारी आणि पत्रकारांना बुधवारी बडतर्फ कामगारांना कामावर घेतले आहे, असे स्पष्ट सांगणाºया आयुक्त सतीश लोखंडे यांनीही आता घुमजाव करीत हात वर केले आहेत. हा वाद कामगार आणि ठेकेदाराने मिटवावा असे सांगत आयुक्तांनी तडजोड करण्याच्या भूमिकेतून अंग काढले आहे.दुसरीकडे, संप सुरु झाल्याचे टेन्शन आल्यामुळे ठेकेदार मनोहर सकपाळ आजारी पडले असल्याचे परिवहन खात्यातील अधिकारी सांगत आहेत. संप सुुरुच राहिला तर ठेका सोडून देईन पण बडतर्फ कामगारांना कामावर घेणार नाही, असे ठेकेदार सांगत असल्याचही ते सांगतात. संपकºयांचे नेते विवेक पंडित यांनी आ़युक्त आणि ठेकेदाराशी सोमवारी संपर्क साधला होता. मात्र, दोघांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे संघटनेचे गणेश उंबरसडा यांनी सांगितले.दरम्यान, दहा बडतर्फ कामगारांना कामावर पुन्हा घेतल्याशिवाय माघार नाही. प्रशासन आणि ठेकेदार ऐकत नसतील तर सफाई कामगारांसह महापालिकेतील श्रमजीवी संघटनेचे कामगारही संपकºयांना पाठिंबा देण्यासाठी संपावर उतरतील, असा इशारा विवेक पंडित यांनी दिला आहे. त्यामुळे परिवहनचा संप चिघण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संपामुळे प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले आहेत.ठेकेदार जर सेवा सोडणार असेल तर महापालिकेने बस सेवा एसटी महामंडळाला द्यावी. महापालिकेने सर्व रुट दिले तर बस सेवा सुरु करू असे एसटीने हायकोर्टात सांगितलेले आहे. त्यामुळे एसटीची वसईकरांना चांगली प्रवाशी सेवा मिळेल, अशी मागणी जनआंदोलनाचे प्रा. विन्सेंट परेरा यांनी केली आहे. सणासुदीत जनतेचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.
सफाई कामगारांची संपाची धमकी, परिवहनच्या संपाचा आठवा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 3:57 AM