नालासोपारा : भुईगाव समुद्रकिनारी गुरुवारपासून अडकून पडलेल्या संशयित बोटीची अखेर २६ तासांनी ओळख पटविण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. ही बोट स्टील लाँच बोट आहे.
स्टील लाँच बोट दोरखंड तुटल्याने नायगावच्या उत्तन समुद्रातून भरकटून वसईच्या भुईगाव समुद्रातील खडकाळ भागात येऊन अडकली होती. ही अज्ञात बोट संशयित वाटत असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळपासून वसई पोलीस व कोस्टल गार्डच्या मदतीने बोटीचे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. मात्र ती खडकाळ भागात असल्याने कोस्टल गार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू ठेवले होते. या बोटीत एक खलाशी अडकला होता. त्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करत किनाऱ्यावर आणण्यात आले. रफिक शेख असे सुटका केलेल्या खलाशाचे नाव आहे. उत्तनच्या समुद्रकिनारी ही बोट असताना चालक जेवण आणण्यासाठी गेला होता व बोटीत खलाशी एकटाच होता. बोट बांधून ठेवलेली रश्शी अचानक तुटल्याने बोट या ठिकाणी येऊन फसल्याचे बोट मालक राफ्टर कालुके यांनी लोकमतला सांगितले. खलाशाला बोटचे इंजिन चालू करता आले नाही. त्यामुळे तो फसला होता. त्याचा मोबाईल सुरू होता व त्याच्यासोबत मी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बोटीवर अडकलेल्या या खलाशाची तब्बल २६ तासांनी सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बोटीचा गुरुवारीपासून काही पत्ता लागत नसल्याने पोलिसांची झोप उडाली होती. अखेर बोट व बोटमालकाची ओळख पटल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान रफिक शेख बोटीत झोपलेला असताना रश्शी तुटली व बोट भरकटली. तो गुरुवारी पहाटे साडेसहाला उठला तेव्हा बोट कुठे तरी आल्याचे त्याला कळले. त्याच्याकडे मोबाईल होता, पण त्यात बॅलन्स नसल्याने त्याला कॉल करता आला नाही. गुरुवारी दुपारी दीड वाजता त्याला सहकाऱ्याने कॉल केल्यावर बोट व त्याची माहिती मिळाली. बोट मालकाने कुठेही बोटची तक्रार दिली नसल्यामुळे त्रास झाला. त्याने मिसिंग तक्रार दिली असती तर शोध लावण्यात वेळ लागला नसता. शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या साहायाने त्याची सुटका केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. - कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे.