मंगेश कराळे
नालासोपारा - वसई पाचूबंदर येथील एक मासेमारी बोट अचानक चोरीला गेल्याने सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या कामी मत्स्य विभागाने कुठलेच सहकार्य न केल्याने मच्छीमार वर्गात संतप्त वातावरण आहे.
अधिक माहितीनुसार, पीटर पेद्रू डांबर यांच्या मालकीची सावपेद्रू नावाची बोट पाचूबंदर येथे किनाऱ्यावर नागरुन ठेवली होती. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बोट जागेवर होती. मात्र त्यानंतर अचानक बोट गायब झाली. बोट गायब झाली त्यावेळी त्यावर विकास नावाचा खलाशी झोपला होता. तो सुद्धा गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले.
यानंतर घड़लेला प्रकार मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना माहिती देऊन सहकार्य मागितले असता त्यांनी याबाबत असमर्थता दर्शवली. यानंतर वसई युवा बलचे अध्यक्ष व्हेलेन्टाईन मिरची यांनी बोट मालक, कुटुंबाला आधार देत वसई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तपास सुरू झाला.
वसई पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे तसेच कोस्ट गार्डचे अधिकारी बी के सींग यांना वसई युवा बलचे अध्यक्ष व्हेलेन्टाईन मिरची यांनी माहिती देऊन समुद्रात प्रत्यक्ष शोध मोहीम राबवण्यात आली. दुपारी २ वाजता सुरू झालेल्या मोहिमेत वसई पोलिसांचे पथक, कस्टम अधिकारी सामिल झाले होते. मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत बोटीचा तपास लागला नाही. बोट कुलाबा, श्रीवर्धन बाजूस गेल्याचा मच्छीमारांचा प्राथमिक अंदाज आहे. अशा पद्धतीने बोट गायब झाल्याची पहिलीच घटना आहे.