मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये सरकारची परवानगी नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नावाचा वापर करून सर्रास प्लास्टिक पिशव्या विकल्या जात असल्याचे मंडळाने पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक व मुकादमांसह टाकलेल्या छाप्यात स्पष्ट झाले. मोठ्या प्रमाणात बेकायदा प्लास्टिक पिशव्यांचा साठा असतानाही पालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे तो साठा जप्त केला गेला नसल्याने यात पालिकेचे संगनमत असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. कारवाईत सुमारे २०० किलो प्लास्टिक जप्त करुन ५५ हजारांचा दंड वसूल केला.
मीरा- भार्इंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ, ग्लास, आदींची सर्रास विक्री व वापर होतो. महापालिका प्लास्टिक विरोधात कारवाईचा दावा करत असली तरी शहरात राजरोस पिशव्यांचा सुरू असलेल्या वापरामुळे या विक्रेत्यांना पालिकेचाच आशीर्वाद असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. एकीकडे बंदी असलेल्या पिशव्या सर्रास विकल्या व वापरल्या जात असताना दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाव एसएसआय व एमपीसीबी क्रमांक टाकून छापलेल्या पिशव्यांचीही विक्री सुरू आहे. या पिशव्यांवर ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडी व पुर्नवापर योग्य असल्याचे छापले आहे. मंगळवारी मंडळाच्या ठाणे विभागाच्या निरीक्षक सुवर्णा गायकवाड यांनी भार्इंदर पूर्व येथील पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम तसेच प्लास्टिक पिशव्यांचे घाऊक विक्रेते यांच्याशी चर्चा केली. विक्रेत्यांनी आणलेल्या पिशव्यांची त्यांनी जाडी तपासली असता त्या अवघ्या २० ते ४० मायक्रॉनच्या आढळल्या. सरकारने कुणालाही पिशव्या छापण्यास परवानगी दिली नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गायकवाड यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यासह भार्इंदर पूर्वेला स्टेशन समोरील मार्केटमध्ये असलेल्या घाऊक विक्रेत्यांच्या दुकानांवर कारवाईला सुरूवात केली. बंदी असलेल्या विविध प्रकारच्या पिशव्या, ग्लास, प्लेट, स्ट्रॉ, थर्माकोल आदी साठा सापडला. आशिष पॅकेजिंग, संभव प्लास्टिक, अरिहंत ट्रेडर्स, नवनिदान आदी घाऊक विक्रेत्यांच्या दुकानांवर कारवाई केली. सरकारची मान्यता नसणाºया पिशव्यांचा मोठा साठा या दुकानां मध्ये असतानाही उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी मात्र केवळ नावापुरत्याच पिशव्या जप्त केल्या. पानपट्टे यांनी या विक्रेत्यांना पिशव्यांचे रिसायकलिंग करून घ्या अशी मोकळीक दिली होती.सरकारने अजून एमपीसीबीचे नाव वापरून प्लास्टिक पिशव्या छपाईला परवानगी दिलेली नाही.भार्इंदर येथील साठ्याबाबत वरिष्ठांना कळवणार आहोत.- सुवर्णा गायकवाड, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळउपायुक्त पानपट्टे यांना कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करा असे सांगितले आहे. सर्व पिशव्यांचा साठा जप्त करा असे कळवले आहे. सरकारची प्लास्टिक बंदी काटेकोरपणे पालिका राबवत आहे.- बालाजी खतगावकर, आयुक्त