मीरारोड - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३० डिसेम्बर पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहीम - २०२१ ची सुरवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या आहेत . त्यांच्यावर कार्यवाही करत ६० हजारांचा दंड वसूल पिशव्या जप्त केल्या गेल्या .
स्वच्छता सर्वेक्षण आलं कि महापालिका शहरात विशेष स्वच्छता मोहिमे सह प्रमुख विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देते . यंदा सुद्धा स्वच्छता सर्वेक्षण सुरु जाहीर होऊन ते ३० डिसेम्बर पर्यंत चालणार आहे . त्या अनुषंगाने आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसरचे पालकत्व दिले आहे .
आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे , लोकांनी ओला - सुका करणे , प्लास्टिक पिशव्या कारवाई करायची आहे . अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथ वरील अतिक्रमण , बेवारस वाहने हटवायची आहेत . बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून शौचालये स्वच्छ - दुरुस्त ठेवायची आहेत . पाणी पुरवठा विभागाने खड्डे बुजवणे , मलनिःस्सारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत . वृक्ष प्राधिकरण , शिक्षण , नगररचना विभागांना सुद्धा त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत .
स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक , कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाले यांच्या कडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला . शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या लोकमत ने सातत्याने दिल्या होत्या . दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती . परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे . पानपट्टे यांनी प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या फेरीवाले आणि दुकानदार यांच्या कडून एकाच दिवसात ६० हजार रुपयांचा दंड वसूल करायला लावला .
डॉ . संभाजी पानपट्टे ( उपायुक्त, आरोग्य ) - प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे . शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे . गेल्या वर्षी शहराचा देशात १९ वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरा मुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारी मुक्त कार्यामुळे ओडीएफ ++ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्याकरिता महापालिका प्रयत्न करणार आहे .