घोलवड : गेल्या २० जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने भातपिकांना संजीवनी मिळण्याची शक्यता वाढली आहे. या पावसाच्या पुनरागमनाने बोर्डी, घोलवड, अस्वाली, कोसबाड, चिखले, व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या भात लावणीच्या कामाला सुरु वात झाली आहे. जून नंतर जुलै महिन्यात पाऊस होईल अशी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु पावसाने तब्बल वीस दिवस ओढ दिल्याने भात शेतीवर त्याचा दुष्परिणाम होऊ लागला होता. या भागातील शेतकरी आपली शेती कशीबशी टिकवण्यासाठी प्रयत्न करीत होते. अनेकांनी उसने पाणी घेऊन तर काहींनी डीझेलपंप व बोअरींगच्या पाण्याचा आधार घेत भातशेती राखण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश ठिकाणी पाणीच नसल्याने या वर्षीची भातशेती वाया जाणार अशी शक्यता होती.एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे कडक उन्हामुळे पिक करपू लागली होती. तर काही ठिकाणची भातरोपे पाण्याअभावी करपलीही. मात्र, पावसाची संततधार सुरु झाल्यास पिकांना दिलासा मिळणार आहे. मशागत करून भातपिकाच्या लावणीसाठी पावसाची वाट पाहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पावसाच्या पुनरागमनाने काही प्रमाणात का होईना शेतीला आधार मिळाला. त्यामुळे शेतकरी सावरला असला तरी पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी व त्याच्या कुटुंबाची मेहनत मात्र पणाला लागली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत पावसाबद्दल बळीराजा समाधानी आहे.
पावसाच्या पुनरागमनाने भाताला संजीवनी
By admin | Published: July 27, 2015 10:57 PM