- अजय महाडीकमुंबई - कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारा कणखर पोलीस अधिकारी जर कनवाळुपणाने वागत असेल, तर खरेच आश्चर्य वाटते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी तळमळ केवळ बोलायला व ऐकायला बरी वाटते, पण प्रत्यक्ष ती आचरणात आणणे आणि ते ही रोजच्या ड्युटीमध्ये हे अशक्यच. मात्र, विक्रमगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी आपल्या कृतीतून तसा आदर्शच घडवून दिला आहे.गत १७ वर्षांपासून ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागांत नोकरी करतांना शाळकरी मुलांच्या पायांत चप्पल नसते, ही बाब त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली. खास करून, सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक असतांना पालघरच्या आदिवासी भागांतील विदारकता हेरून त्यांनीआपल्या सरकारी जीपमध्ये मागच्या बाजूला साधारण पाच ते १२ वर्षांच्या मुलामुलींना होतील, असे चप्पल-बुटांचे १०-१५ जोड ठेवणे आणि पेट्रोलिंग करतांना गावपाड्यांवर कुणी विद्यार्थी अनवाणी दिसल्यास गाडी थांबवून त्याच्या पायांत ती घालणे हे नित्याचेच बनले आहे. त्यावेळी चांगला अभ्यास करेन हे प्रॉमिस घेण्यास मात्र ते विसरत नाहीत.विक्रमगड पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एका खोलीतील कोपऱ्यात नव्याकोºया चप्पल-बुटांच्या खोक्यांची उतरंड पाहायला मिळते. येथल्या पोलीस ठाण्यात रोज काही फार गंभीर तक्रारी नसतात. नवराबायकोची भांडणे, शेतीच्या बांधावरून होणारे वाद, याचेच प्रमाण तुलनेने अधिक असते. त्यामुळे कामही कमी असते. यावेळी आईवडिलांसह जी मुलेमुली पोलीस स्टेशनमध्ये येत असतात. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकतांना त्यांच्या नजरेतून या मुलांच्या पायांचे अनवाणीपण सुटत नाही आणि लगेचच सरकारी जीप किंवा मागच्या रूममधील चप्पल-बुटांचे जोड आणले जातात.पाटील यांच्या या उपक्रमाची माहिती त्यांच्या संपर्कात येणाºया ज्यांनाज्यांना कळाली, तेव्हा तेही सहभागी झाले पोलीस स्टेशनमधील त्यांच्या सहकाºयांनाही त्यांच्या बांधीलकीचे कौतुक वाटते आहे. आतापर्यंत पनवेल येथील रसायनी , राजगड गुन्हे अन्वेषण शाखा, राजापूर, रत्नागिरी एलसीबी, शहापूर, सफाळा, बोईसर, सातपाटी आणि आता विक्रमगड पोलीस स्टेशन असा त्यांच्या समाजसेवेचा अनोखा प्रवास आहे.त्यांचे बोलके डोळे खूप काही सांगतात...आदिवासी समाजातील ही मुले अनोळखी व्यक्तींशी कमी बोलणारी व लाजाळू असतात त्यांच्या पायांत चप्पल व बूट घातल्यावर त्यांच्या चेहºयावर उमटणारा आनंद खूपच बोलका असतो. चमकत्या डोळ्यांतून व्यक्त होणारी आपुलकी खूप काही सांगून जाते. पूर्वी पोलीस जीप दिसल्यावर पळणारी ही पाड्यावरची मुले आता रस्त्यावर उभे राहून हात उंचावून आपला आनंद प्रकट करतात. काही जण जवळ येऊन थँक यू, असे इंग्रजीत म्हणू लागल्याचे ते भरभरून सांगतात.
अनवाणी मुलांना पादत्राणे देणारा खाकी वर्दीतला ‘सांताक्लॉज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 2:07 AM