वाडा : वाडा तालुक्यातील सानोळे (गावठाण) व सानोळे खुर्द या गावात डेंगी तापाची साथ आली असून त्याची लागण सहा जणांना झाली आहे. याप्रक ाराने दोन्ही गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुष्णा भराडे (६०), कविता भराडे (४६), निर्मला पाटील (४५), ज्ञानेश्वर विशे (४०), योगेश राउत (३९), धनंजय राउत (२५) या सहा जणांना डेंगी तापाची लागण झाली असून यातील वरील तीन रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात तर ज्ञानेश्वर योगश व धनंजय या तीन रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनाळे गावठाण व सोनाळे खुर्द या गावातील वरील नागरिकांना गेल्या काही दिवसा पासून ताप, अंगदुखी, थंडी, सांधे दुखणे, तीव्र डोळे दुखी अशी लक्षणे आढळल्याने त्यांनी दोन दिवसापूर्वी वाडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या नंतर त्यांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून वरील तीन रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात तर उर्वरित तिघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या दोन्ही गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य कर्मचारी गावात ठाण मांडून बसले असून डेंगीचे डास मारण्यासाठी जंतूनाशक फवारणी करीत आहेत. ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)
सानोळेत डेंगीची साथ
By admin | Published: May 24, 2016 2:42 AM