सुरेश काटे
तलासरी : तलासरी वीज परिमंडळाच्या अखत्यारीत ग्राहकांकडे साडेसात कोटी रुपयांची थकबाकी झाली असल्याने वीज थकबाकी भरण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ससेमिरा सुरू झाला आहे. दरम्यान, राजकारण्यांच्या धरसोड धोरणामुळे वीजग्राहक संभ्रमात पडले असून वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार ग्राहकांवर आहे.
कोरोनाच्या काळात वीज मीटरची रीडिंग न घेतल्याने सध्या ग्राहकांना भरमसाट वीजबिल आल्याने ग्राहक हादरून गेले आहेत. आधीच कोरोनाच्या काळात व्यापारधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आता कुठे गाडी रुळावर येत असतानाच वीजबिलाचा शॉक ग्राहकांना बसत आहे.
कोरोनामुळे वीजबिल माफ करावे, त्यात सूट देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकारण्यांनीही वीजबिल भरू नका, असे जनतेला सांगितल्याने ग्राहक द्विधा मनस्थितीत अडकले आहेत. बिल न भरल्याने थकबाकी वाढली आणि आता बिल भरण्याचा ससेमिरा मागे लागल्याने ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत.
वीजबिल भरू नका, सांगणारे राजकीय पक्षांचे पुढारी आता गप्प बसले आहेत. तलासरी तालुक्यात २७ हजार ९०० वीजग्राहक असून त्यामध्ये १५ हजार ग्राहक हे घरगुती कनेक्शनचे आहेत. या वीजग्राहकांची ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतीचे वीजग्राहक ५७९ असून त्यांच्याकडे १५ लाखांची वीज थकबाकी आहे. या शेती वीजग्राहकांना ५० टक्के वीजबिलात माफी देण्यात आली असून वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के वीजबिल माफी देण्यात येत आहे. दरम्यान, २४३ ग्राहक थकबाकीदार आहेत.
वीजबिल भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, शेती वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. वीजचोरी करू नका, मागेल त्याला वीज मीटर देऊन वीजपुरवढा करण्यात येईल. - यादव इंगळे, उपअभियंता, वीज वितरण कंपनी, तलासरी