- हितेन नाईक, पालघरसातपाटीच्या बाजारपेठेत केळवा, एडवण, डहाणू येथील मच्छीमारांचे मासे विक्रीसाठी आणले जातात. परिणामी, आपल्या माशांची विक्रीच होत नसल्याचे सांगून सातपाटीच्या काही महिलांनी बुधवारी आक्रमक होत त्यांच्या मच्छींचा टेम्पो रोखून धरीत ती उतरविण्यास मज्जाव केला. यामुळे वातावरण तंग झाले असून याबाबत सामंजस्याने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.सातपाटी हे एक प्रगतिशील मासेमारी बंदर असून ४०० ते ५०० लहान-मोठ्या नौकांद्वारे मासेमारी केली जाते. या गावातून गिलनेट पद्धतीने समुद्रातील पाण्याच्या प्रवाहासोबत जाळे सोडून मासे पकडले जात असल्याने तसेच पकडलेले मासे बर्फात ठेवले जात असल्याने गुणवत्ता व चवीबाबत सातपाटीचे मासे सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे वापी, डहाणू, विक्रमगड, वाडा, जव्हार, नाशिक, पुणे इ. भागांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी मासे खरेदीसाठी येत असतात. तर, परदेशात एक्स्पोर्ट करणारे व्यापारीही सातपाटीला प्रथम प्राधान्य देत असतात.वर्षभरात ३ ते ४ महिनेच होणाऱ्या उत्पन्नावर त्यांना वर्षभराचा उदरनिर्वाह करावा लागतो. सध्या त्यांच्या बोटीत सापडलेली मच्छी विक्रीसाठी ठेवले जात असताना केळवे भागातून टेम्पो भरून मच्छीविक्रीसाठी येत असल्याने सातपाटीच्या मच्छींची विक्री होत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे डिझेलचा खर्चही सुटत नसल्याने आज महिलांनी केळवा येथील मच्छींचा टेम्पो रोखून धरला. या वेळी बाचाबाची झाल्यानंतर ग्रामपंचायत, दोन्ही सहकारी संस्थांनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी महिलांनी केली. (वार्ताहर)कायद्याप्रमाणे मासेविक्री रोखू शकत नाही, परंतु दोन्ही समाजांची बैठक लावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.- विश्वास पाटील, सरपंच
मासेविक्रीवरून सातपाटीत वातावरण तंग
By admin | Published: October 07, 2015 11:59 PM