लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई पंचायत समितीच्या पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वेतनवाढ घोटाळा व रुग्ण कल्याण समितीची परवानगी न घेताच करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या नियमबाह्य खर्चाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. आता आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण निधीचा अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. २०१५-१७ या कालावधीत सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. तो खर्च करण्यासाठी रु्ग्ण कल्याण समितीची परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र ती न घेताच तो खर्च करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यात कार्यालयाची साफसफाई, झेरॉक्स बिले, शौचालयाची देखभाल आदी कामांवर तो नियमबाह्य रीतीने खर्च करण्यात आला आहे. पारोळ प्राथमिक आरोग्य सेवकाला एमएसडब्ल्यू हा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला नसतांना जुलै २०१६ पर्यंत वेतनवाढी दिलेल्या आहेत. तर मांडवी जिल्हा परिषद दवाखान्यातील आरोग्य सेविकेने एमएससीआयटी परिक्षा पास केली नसतांनाही वेतनवाढ दिली गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसई पंचायत समितीच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मराठी आणि हिंदी भाषा परिक्षेत दांडी उडाली असतांना त्यांनाही नियमबाह्य वेतनवाढ दिली गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विवेक कांबळे यांनी केली आहे.