अनिरुद्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : रब्बी हंगामातील मिरची उत्पादनासाठी डहाणू तालुका प्रसिद्ध आहे. पहिल्या टप्प्यातल्या उत्पादनाला प्रारंभ झाला असून मे अखेरपर्यंत हा हंगाम राहतो. मात्र, याच काळात अन्य व्यवसायासाठी मजुरांची मागणी कमालीची वाढत असल्याने मिरची तोड मजुरांचा तुटवडा भासून शेतकऱ्यांसमोरील अडचण वाढते आहे.
डहाणू तालुका कृषी विभागाअंतर्गत डहाणू, वाणगाव आणि कासा या तीन मंडळांचा समावेश आहे. प्रत्येक मंडळात बारा सजा असून ८५ ग्रामपंचायती मिळून १७४ गावे आहेत. गेल्या दशकापासून तालुक्यात मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ होऊन ते ९५०.५० हेक्टर झाले आहे. त्यापैकी ठिबक सिंचनाखाली ८५०.२० हेक्टर आहे. वाणगाव मंडळात या पिकाची शेती अत्याधुनिक पद्धतीने केली जाते. येथील प्रगतीशील शेतकºयांनी यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून त्यांना मिळणारा आर्थिक नफा लाखोंच्या घरात आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन डहाणूसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही मिरची लागवडीचे प्रमाण वाढत आहे. या जिल्ह्यात चिकू बागायती आणि मासेमारी व्यवसायाप्रमाणेच मिरची उत्पादनानेही कोट्यवधी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. ही सुखावह बाब असली तरी मजुरांची मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
जानेवारीपासून स्थानिक आणि परजिल्ह्यात बांधकाम व्यवसाय तेजीत सुरू होऊन पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत मजुरांना वाढती मागणी असते. त्यांना तिपटीने मजुरी मिळत असल्याने शेतीसाठी मजुरांचा तुटवडा भासतो. मिरची पिकास लागवडीपासून औषध फवारणी, खत व्यवस्थापन, तण काढणीपेक्षा उत्पादनाला प्रारंभ झाल्यापासून प्रत्येक तोडणीला मजुरांची गरज मोठ्या संख्येने भासते. वातावरणात उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे योग्यवेळी तोडणी न केल्यास फळ लालसर होऊन दर कमी मिळतो. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे मध्ये उत्पादकांच्या अडचणीत अधिकच वाढ होते.
मजुरांचा तुटवडा का भासतो?जादा पैशांकरिता मिरची तोड मजूर अन्य व्यवसायकडे. महिला वर्गाची शेतीपेक्षा औद्योगिक वसाहतीत काम करण्यास पसंती. आदिवासी मजूर मिरची उत्पादक बनले तर काही गट शेती करू लागले. वाढत्या लग्न सराईसह विविध कार्यक्र मामुळे मजुरांची गैरहजेरी.