सुनील घरत पारोळ : परिसरातील खानिवडे गावामध्ये माकडांनी उच्छाद मांडला असून त्यांच्या हल्ल्यामध्ये येथील एक महिला जखमी झाली आहे. गत काही दिवसात अनेक घरांचे या मर्क टांनी नुकसान केले असून माहगड्या वस्तूंची तोडफोड केली आहे. त्यांना पकडण्यात वनखात्याच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश न आल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.घराच्या छतावरून मोठ्याने उड्या मारणे, विजेचे खांब जोरात हलवून वीज प्रवाह खंडित करणे, घराची कौले उचकून किंवा तोडून घरात प्रवेश करून महागड्या वस्तूंची तोडफोड करून घरात मिळेल ते खाद्य घेऊन पळ काढणे, याला जर विरोध केला तर हल्ला करणे, रस्त्यावरून जाणाºया येणाºया महिलांना व लहान मुलांना ते बेसावध असताना त्यांच्या हातातील वस्तू अचानक पळवणे, त्याला हुसकावल्यास चावा घेऊन जखमी करणे या प्रकारामुळे गावकरी पुरते हैराण झाले आहेत.एकट्या दुकट्यावर अचानक हल्ला करणाºया या माकडांची एवढी दहशत आहे की, घरातून बाहेर पडतांना नागरिक हातात काठ्या व दंडूके घेऊन बाहेर पडत आहेत. माकडाचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालय व सजग नागरिकांनी वनखात्याच्या मार्फत रेस्क्यू टीमच्या मदतीने दोनदा माकडाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु चलाख वातात्मजकापुढे वनखात्याला अपयश आले आहे.आता पर्यंत या माकडांनी अनेक घरातील वस्तूंची तोडफोड केली असून रत्नप्रभा घरत या महिलेला चावा घेऊन जखमी केले आहे. तर देवा नामक एका इसमाच्या थोबाडीत मारली आहे. अनेक कुत्र्यांना त्याने चावे घेतले असून कुत्र्यांच्या पिल्लांना जखमी केले आहे. त्याच्या या दहशतीच्या वातावरणामुळे शाळेतील लहानग्यांना मोठ्यांच्या संरक्षणात शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे वन खात्याने लवकरात लवकर या माकडांना जेरबंद करण्याची मागणी रहिवाशी करत आहेत.>मी घरातील सामान घेण्यासाठी बाहेर पडली असताना अचानक माकड समोर येऊन पिशवी खेचू लागले. मी पिशवीची पकड घट्ट करताच माझ्या हाताला त्याने कडकडून चावा काढला व मला जखमी केले.- रत्नप्रभा घरत,गृहिणी (खानिवडे)वनखात्याने पुन्हा एकदा रेस्क्यू करण्याचे ठरवले असून ही माकडे गावातील कोणत्या ठराविक ठिकाणी जास्त वेळ किंवा रात्रीच्या वेळी बसते याचा माग घेणे सुरु आहे. यावेळी जास्त साहित्य व मनुष्यबळाचा वापर करून रेस्क्यू करण्यात येईल.- मनोहर चव्हाण, वनक्षेत्रपाल
खानिवडेत माकडांची दहशत, वनखात्याचे रेस्क्यू आॅपरेशन फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:14 AM