पालघर : पालघरमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस एका टायरशिवाय धावल्याची घटना सोमवारी घडली. स्कूलबसच्या समोरील बाजूचे टायर व्यवस्थित होते. मात्र मागील बाजूस असेलेल्या दोन टायरपैकी एक टायर निखळला होता. यामुळे या बसचा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, ही गोष्ट बसच्या पाठिमागून जाणा-या एका शिवसैनिकांच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची अद्याप कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही. तसेच या घटनेनंतर असे समजले की स्कूलबस चालक हा नेहमीचा नसून नवीन आहे. त्याला फक्त एक दिवस बस चालविण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, ज्यावेळी बस थांबवून त्याकडे परवान्याची चौकशी केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे निदर्शनास आले.
शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे सचिव विलास जोशी हे ठाणे ते पालघर हा प्रवास करत होते. त्याचवेळी ही स्कूलबस धावत असताना ती थोडी हलताना दिसली. त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचे लक्ष बसच्या टायरकडे जाताच एक टायर नसल्याचं निदर्शनास आल्याचे विलास जोशी यांनी सांगितले. त्यानंतर लगेच ही बस थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बस चालकाला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या स्कूलबसमध्ये पालघरमधील सुंदरम सेंट्रल स्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी होते. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सुनील कुमार यांना विचारले असता, त्यांनी या घडलेल्या प्रकारानंतर बस मालकासोबत शाळेचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात येईल असे सांगितले.