शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : तालुक्यातील तब्बल ९८ शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी त्यातील तब्बल २५ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द शिक्षण खात्यानेच दिला आहे. शिक्षण विभागाने तालुक्यातील ९८ शाळा डीजिटल केल्या आहेत. एक शाळा डीजिटल करण्यासाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च येतो. एकीकडे शाळा डीजिटल केल्या जात असताना त्यांच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने अनेक शाळांच्या इमारतींची पडझड सुरु झाली आहे. आडणे, पाचरुखा, नागले, शिलोत्तर, हेदवडे, खानीवडे, सकवार, केलीचापाडा, शिरसाड, पाणजू (प्राथमिक), चिंचोटी, बोबडपाडा, वाकीपाडा, टिवरी, कोपरी, गास कोपरी, तुळींज-१, पेल्हार, बरफपाडा, कोलोशी, कुवरपाडा, बेगर्सहोम, हिरा विद्यालय विरार-१, निळेमोरे, आचोळे-२ या शाळा डीजिटल करण्यात आले आहे. डीजिटलमुळे आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर सुरु करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे. या शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी या शाळांच्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. आडणे शाळाचे छत कोसळून पडले आहे. इतरही शाळांच्या खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसा अहवाल वसई पंचायत समितीच्या शिक्षण खात्याने पाठवला आहे. डीजिटल झालेल्या तालुक्यातील २५ शाळांच्या ५३ वर्ग खोल्या धोकादायक अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या शाळांची मोठी दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. शाळा डीजिटल करणे काळाची गरज आहे. मात्र, त्याचबरोबर शाळा इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सध्या धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. एक शाळा डीजिटल करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे शाळा डीजिटल करण्याआधी धोकादायक इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम पाटील आणि युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
शाळा डिजिटल, इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 6:35 AM
तालुक्यातील तब्बल ९८ शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी त्यातील तब्बल २५ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द शिक्षण खात्यानेच दिला आहे.
ठळक मुद्दे२५ डिजिटल शाळांच्या इमारती धोकादायक ग्रामपंचायतींकडून तक्रारी होऊनही होते दुर्लक्ष