- रवींद्र साळवेमोखाडा : धामनशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीमधील पायरीची वाडी येथील नववीत शिकणारी दर्शना बुधा पारधी वय (12 वर्ष) ही शाळकरी मुलगी घोटभर पाण्यासाठी आटापिटा करत असताना नादुरुस्त विहिरींची पायरी कोसळून पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन कानातून रक्त येत होते.सदरची घटना कळताच गावकऱ्यांनी तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्काळ नाशिक येथील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या आदिवासीपाड्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. परंतु अनेकदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पाठवून देखील येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जात नसल्याने तीव्र संताप पायरवाडीच्या ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ग्रामपंचयातीच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला टँकर सुरू झाले नसल्याची खंत येथील ग्रामस्थ शिवराम देऊ खानझोडे यांनी व्यक्त केली.
विहिरीत पडून शाळकरी मुलगी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 10:34 PM