मीरारोड - शाळेतजखमी झालेल्या चौथीच्या विद्यार्थ्यावर उपचार न करता रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार महापालिकेच्या भाईंदर येथील शाळेत घडला आहे. पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक व शिक्षिकेकडे याबद्दल संताप व्यक्त केला. परंतु, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बेजबाबदार मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाईस टाळटाळ केली आहे.भाईंदर पश्चिमेस महापालिकेची शाळा आहे. यातील शाळा क्र.३० हिंदी माध्यमाच्या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या सागर शर्मा याचे शाळेत अन्य एका विद्यार्थ्याशी भांडण झाले. त्यात सागरच्या डोक्याला मार लागून रक्ताची धार वाहू लागली. मात्र, वर्ग शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सागर याच्यावर प्रथमोपचार केले नाहीत.सागर घरी येताच कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे नेले. त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले. आई-वडिलांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने घडला प्रकार सांगितला. यामुळे संतप्त पालकांनी शाळेत येऊन शिक्षिका ममता यादव व मुख्याध्यापक सिंग यांना जाब विचारला. जखमी मुलाला तुम्ही दोन तास शाळेत बसवून का ठेवले ? जखमी मुलावर प्रथमोपचार करण्याची किंवा त्याला जवळच्या इस्पितळात नेणे ही तुमची जबाबदारी नाही का ? असे सवाल पालकांनी केले. रक्तबंबाळ अवस्थेत सागरला तुम्ही घरी पाठवले, पण वाटेतच त्याला काही झाले असते तर त्याची जबाबदारी कुणाची? अशा प्रश्नांची सरबत्ती पालकांनी केली.याप्रकरणी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बेजबाबदार शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ चालवली आहे. यापूर्वी देखील या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा गैरप्रकार चव्हाट्यावर येऊनही पालिकेने त्यांना पाठीशी घातले आहे.
आधी या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर देखील अधिकाऱ्याने कार्यवाही केली नाही. जखमी विद्यार्थ्याला तसेच उपचाराविना घरी पाठवल्याच्या प्रकरणाची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. - दीपक पुजारी, उपायुक्त, मनपा शिक्षण विभाग