- सुरेश काटेतलासरी - तलासरी तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यात आले आहेत. परंतु, वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षकांची कोरोना चाचणी होणे बाकी आहे. तलासरीसह ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांची ही चाचणी झाली नसल्याची बाब समोर आली असून, या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.तलासरीतील जिल्हा परिषद आणि इतर अशा २०६ शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. परंतु, या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी होणे अपेक्षित होते. शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे शिक्षकांनी दिनांक २५ ते ३० जानेवारीपर्यंत कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश काढले आहेत. तलासरी येथील नवनिर्मित आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीमध्ये तालुक्यातील शिक्षकांचे आरोग्य विभागामार्फत आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेण्यात येत आहेत. यासाठी शिक्षकांना आदल्या दिवशी नावाची नोंदणी करून दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी फक्त ९० जणांचे स्वॅब घेतले जात असल्याने चाचणीसाठी स्वॅब दिलेल्या शिक्षकांना अहवाल प्राप्त होईपर्यंत शाळेत हजर होता येणार का, याविषयी संभ्रम आहे. चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत करायचे काय, याबाबत काहीही सांगण्यात आले नसल्याने शिक्षण विभागाच्या नियोजन अभावाचा त्रास शिक्षकांना भोगावा लागत आहे. याबाबत शिक्षक संघटनेचे दत्तात्रय कोम यांनी नाराजी व्यक्त करत शाळा सुरू होण्याअगोदरच कोविड चाचणी घेणे अपेक्षित होते, परंतु शिक्षण विभागाचे कसलेही नियोजन नसल्याने शिक्षकांना अहवाल प्राप्त झाल्यावरच शाळेत हजर होता येणार असल्याचे सांगितले. दररोज ९० जणांचे स्वॅब शिक्षकांना आदल्या दिवशी नावाची नोंदणी करून दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी फक्त ९० जणांचे स्वॅब घेतले जात आहेत.
तलासरी तालुक्यात शाळा झाल्या सुरू, मात्र शिक्षकांची कोविड तपासणी बाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:48 AM