वसंत भोईर / वाडासध्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कुपोषणाची समस्या वाढत असून त्याची देशभर चर्चा सुरू आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना आश्रमशाळांमध्ये त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेले आरोग्य पथकावर आपल्या इतर समस्यांबरोबरच वाहन सुस्थितीत नसल्याने मर्यादा आल्या आहेत.साखरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू व आजारांनी फणफणत असणारे विद्यार्थी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी हा गंभीर व महत्त्वाचा मुद्दा समोर येत असून आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकाला शासनाने तत्काळ वाहन उपलब्ध करून द्यायला हवे, अशी मागणी केली जात आहे. वाडा व विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा तपासणीसाठी वाडा रुग्णालयात एक स्वतंत्र पथक आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व परिचारिका यांच्यासह वाहन व चालक अशी एक टीम तैनात आहे. हे पथक दोन्ही तालुक्यातील २८ आश्रमशाळा व वसतिगृहातील जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करत असतात. मात्र, या पथकाचे वाहन गेल्या वर्षभरापासून नादुरु स्त आहे. पथकाकडे असणारे हे वाहन खरंतर १६ वर्षे जुने असून वापरण्यास एक प्रकारे अयोग्यच आहे. मात्र, शासकीय अनास्थेमुळे नाइलाजाने तरीही ते वापरण्याची वेळ येथील अधिकाऱ्यांवर आली आहे. हे वाहन वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने पथकाला आश्रमशाळांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पथकाला तत्काळ एखाद्या वाहनांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र अधिकाऱ्यांनी दिले आहे. या परिस्थिीतीमुळे संताप व्यक्त होत आहे.
वाड्यातील वैद्यकीय पथकाकडे भंगार वाहन
By admin | Published: October 15, 2016 6:35 AM