नालासोपारा : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांपासून सर्वच जण संकटात सापडले आहे. गरीब वर्गाकडे तर रोजीरोटीचे संकट उभे टाकले आहे. कोरोनामुळे मूर्ती व्यवसायिकांनाही फटका बसला असून सात दिवसांवर गणेशोत्सव आला असला तरी मूर्त्यांची विक्री होत नसल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणारे प्रथमेश एनपुरे यांचा आचोळे रोडवरील चंदननाका येथे गणपतीच्या मूर्त्या बनविण्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणी मूर्ती बनविणारे सुनील कांबळे यांनी सांगितले की, कोरोनामुळे या वेळी मूर्त्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गणेशोत्सव येण्याच्या २० ते २२ दिवसांपूर्वी दरवर्षी अंदाजित तीनशे ते चारशे मूर्त्यांची बुकिंग होऊन विक्री होते. पण या वेळी मात्र फक्त शंभर मूर्त्यांची बुकिंग होऊन विक्री झालेली आहे. कोरोनामुळे नागरिक भीतीने आपापल्या गावी गेल्याने मूर्त्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. यंदा वसईत अंदाजे दोनशे मूर्तिकारांवर कोरोनामुळे परिणाम झाला असून सरकारच्या नियमावली-नुसार या वर्षी ४ फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या बनवत असून दरवर्षी १२ ते १५ फुटापर्यंत मूर्त्या बनवायचे. कोरोनामुळे या वर्षी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द केले आहेत. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान मूर्तिकारांचे झाले आहे.> गेल्या वर्षी कारखान्यात ग्राहकांची इतकी गर्दी असायची की, जेवण घेण्याससुद्धा वेळ मिळत नसे. मात्र, कोरोना संकटामुळे या वर्षी मूर्तिकारांचे ६० टक्के नुकसान झाले आहे. दरवर्षी कारखान्यात १५ ते २० कामगार गणपतीच्या मूर्ती बनवत होते, पण या वर्षी गणपतीमूर्तींचे बुकिंग नसल्याने घरातीलच काही जण मिळून हे काम करीत असल्याचे मूर्तिकार सुनील कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोना संकटामुळे मूर्तिकार संकटात, मूर्तींची विक्री घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:33 AM