वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने आधीच मच्छीमारांना आर्थिक फटका बसला असताना, आता पुन्हा नूतन वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच दि.१ जानेवारीपासून ओएनजीसीकडून समुद्रात पुन्हा तेल सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे. या सर्वेक्षण कालावधीत मासेमारी बोटींना सर्वेक्षण क्षेत्रापासून लांब राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शविल्यामुळे भरपाई देण्यात येईल, असे वारंवार आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा स्थानिक मच्छीमारांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शवत, मच्छीमार संस्थांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी मत्स्यव्यवसाय विभागाकडे केली आहे.
ठाणे, पालघर, मुंबई जिल्ह्यांत समुद्रात दरवर्षी ओएनजीसी कंपनीमार्फत नैसर्गिक तेल व वायू सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाची सुरुवात २००४ पासून करण्यात आली आहे. त्यावेळी मच्छीमारांना विश्वासात घेऊन दरवेळेस सर्वेक्षण करण्याची गरज नाही, असेही सांगण्यात आले होते.
ओएनजीसीकडून ज्या ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते व माशांचे प्रजननही होते. त्यामुळे या ठिकाणाला ‘गोल्डन बेल्ट’ म्हणून ओळखले जाते. मात्र, सर्वेक्षण सुरू असलेल्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात मासेमारी करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान होते.