- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी - या दिवाळीला म्हणावी तशी थंडी नसली, तरीही डहाणूतील समुद्रकिनारी सिगल पक्षांचे आगमन झाले आहे. दरम्यान ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी पक्षी दर्शनाची पर्वणी लाभल्याने पर्यटकांसह स्थानिकही सुखावले आहेत. या भागात आगामी काळात पक्षी निरीक्षणाकरिता पर्यटनाचे नवे दालन विकसित होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.तालुक्यातील नरपड-चिखले खाडी पूलानजीकच्या किनारी भागात असलेल्या वाळूच्या बेटावर सिगल पक्षांचे थवे दरवर्षी हिवाळ्यात दृष्टीस पडतात. या वेळी दिवाळीला थंडी नसतानाही त्यांचा वावर आढळून आला आहे. थव्यांनी आढळणारे हे पक्षी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. निर्मनुष्य तसेच कोणत्याही सोयी -सुविधा नसतांनाही हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी परगावतील पर्यटकही मोठी गर्दी करतात. वाळू बेटावर पक्षी निरीक्षणासाठी कॅमेरा घेऊन तासंतास घालवणारेही अधिक आहेत. किनाºयावर थव्यांमधून दाटीवाटीने बसलेले, घिरट्या घालणारे आणि लाटांवर पोहणारे सिगलांचे थवे पाहण्यासाठी मागील काही वर्षांपासून पर्यटक विकेंडला दिसू लागले आहेत. त्यांना समुद्रससाणा, खंड्या, टिटवी, बगळ्यांच्या विविध जातीही दृष्टीस पडत आहेत. नरपड-चिखले खाडीपूला प्रमाणेच घोलवड मरवाडा, टोकेपाडा, कोलपाडा खाडीनजीकचे कांदळवन, बोर्डीचा किनारी सिगलांचे दर्शन होते. शिवाय जस-जशी थंडी पडू लागेल, तसे लहान-मोठे विविध जातींचे आण िआकारातील स्थलांतरीत पक्षीही विनासायास दिसतील.दरम्यान दिवाळीनिमित्त पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला असून मोठ्या संख्येने परगावतील पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यांना पक्षी निरीक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आगामी काळात विशेषत्वाने पक्षी निरीक्षणकरिताच पर्यटक येतील आणि पर्यटनाचे दालन उघडे होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. या करिता समुद्रकिनारी अवैध रेती चोरी, समुद्र अधिनियम पायदळी तुडवून पाणथळ जागांवर होणारे जैवविविधतेला धोका पोहचिवणारे बांधकाम थांबणे आवश्यक आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर साधली गेली समुद्रकिनारी सिगल दर्शनाची पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 2:39 AM