- मंगेश कराळे
नालासोपारा : एक दिवसाच्या नवजात स्त्री अर्भकाचा परित्याग करणाऱ्या आरोपी महिलेचा शोध घेण्यात नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
नायगाव जुचंद्रच्या वाकीपाडा परिसरातील खैरकोंडा रोड पाटीलवाडी येथील बागेसमोर २९ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला कापडात गुंडाळलेल्या एका पाच दिवसाचे नवजात स्त्री जातीचे जिवंत अर्भक नागरिकांना सापडल्याने खळबळ उडाली होती. नायगाव पोलिसांनी नवजात बालकाचा परित्याग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून नवजात अर्भकाच्या माता पित्याचा शोध घेत होते. दाखल उपराघ प्रकरणाचे गांभीर्य व संवदेनशीलता लक्षात घेवुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अमंलदार यांनी गुन्हयाचा तपास प्रारंभ केला.
बालकास संपुर्णताह परित्याग करण्याच्या उद्देशाने उघडयावर टाकुन देणाऱ्या वारसांचा शोध घेण्याकरिता परिसरातील माता बालसंगोपन केंद्र, प्राथामिक आरोग्य केंद्र, खाजगी रुग्णालये, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व परिसरातील माहिला यांचेकडे सखोल तपास करण्यात आला. तपासअंती मिळालेल्या माहितीच्या आधारे नवजात बालकास उघडयावर टाकुन दिलेल्या माहिला प्रियंका निरंपन सिध्दार्थ (२३) हिचा शोध घेवुन तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर आदींनी तपास केला.