अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : गतवर्षीप्रमाणे यंदाही डहाणू तालुक्यातील चिंचणी तसेच तारापूर परिसरात युरोपियन कलहंस पक्ष्यांचे आगमन झाले आहे. स्थानिक पक्षिनिरीक्षकांना त्यांचे दर्शन झाले. यामुळे पक्षी अभ्यासक आणि पर्यटनाला नवा आयाम मिळाला आहे. दरम्यान, या पक्ष्यांना मुक्त संचार आणि शिकारीचा धोका टाळण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
या युरोपियन कलहंसाचे दर्शन गतवर्षी पहिल्यांदाच १८ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यात झाले होते. त्या वेळी केवळ या पक्ष्यांची एकच जोडी दिसली होती. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून चिंचणी आणि तारापूर येथील श्रीकृष्ण तलाव तसेच कलोवली येथील खाडी परिसरात या पक्ष्यांचे थव्याने दर्शन झाले. या पक्ष्यांची संख्या वाढणे ही सकारात्मक बाजू असल्याची माहिती चिंचणी येथील पक्षिनिरीक्षक प्रवीण बाबरे यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील ११० किमीच्या सागरी किनारपट्टी आणि खाडी परिसरात हे पक्षी मोठ्या प्रमाणावर असण्याची दाट शक्यताही पक्षिनिरीक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणांचे संवर्धन करण्याची गरज आहे. तर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला या पाहुण्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
दोन-तीन वर्षांपूर्वी पालघर तालुक्यातील खाडी परिसरात फ्लेमिंगोंची शिकार झाली होती. अशा घटना रोखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. शिवाय समुद्रातील अवैध रेती उपसा, खाडीकिनारी भराव, सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून होणारी बांधकामे, वृक्षतोड आदींवर पायबंद घालण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.
या पक्ष्यांनी दुसऱ्या वर्षी या भागात हजेरी लावली आहे. यामुळे पक्षी अभ्यासक व निरीक्षकांची पावले येथे वळू लागली आहेत. वन विभाग, स्थानिक प्रशासनाने त्यांच्या अधिवासाकरिता प्रयत्न करणे अपेक्षित आहे.- प्रवीण बाबरे, पक्षिनिरीक्षक, चिंचणी
स्थानिकांनी पक्षिनिरीक्षणाचा आस्वाद घ्यावा, मात्र पक्ष्यांना त्रास देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. जनजागृतीकरिता पाऊल उचलले जाईल.- एन.एल. मोरे, वन परिक्षेत्र अधिकारी, बोईसर