मीरारोड - गेल्या महिन्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आधी टाळाटाळ केली व नंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेताना ज्याच्या विरोधात तक्रार होती त्याच आमदार नरेंद्र मेहतांना चक्क साक्षीदार केल्याने पीडित सुरक्षा रक्षकाने या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली आहे .
मॅक्सस मॉलसमोरील मॅक्डोनाल्ड जवळ चाय सुटा बार बाहेर रस्त्यावर सोमवार 19 नोव्हेंबर रोजी रात्री आ. मेहता यांची गाडी उभी राहिली . वाहतूक कोंडी झाली म्हणून चहा दुकाना वरील सुरक्षा रक्षक मारुती हरिजन याने मेहताना गाडी पुढे घ्या सांगितले असता शिवीगाळ करत त्यांनी व त्यांच्या सोबतच्या इसमाने मारहाण केल्याची तक्रार भाईंदर पोलिसात झाली होती. त्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसात तक्रार देऊ नको सांगून हरिजन ऐकला नाही म्हणून त्याला चाय सुटा बार दुकानातून काढून टाकले . दुसरीकडे भाईंदर पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ चालवली. इतकेच काय तर सीसीटीव्ही फुटेज देखील नसल्याचे दुकानदाराने सांगितले. पोलिसांवर टीकेची झोड उठल्या नंतर हरिजन याच्या तक्रार अर्जा वरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद भाईंदर पोलीसांनी केली खरी . पण त्यात ज्या आ . मेहतां विरोधात तक्रार होती त्यांचे नाव चक्क साक्षीदार म्हणून गुन्ह्यात नोंदवले आहे. मला मारहाण व शिवीगाळ का केली ? असा सवाल करत पोलीसांकडे दाद मागणाऱ्या हरिजन याला सदर प्रकाराने आश्चर्याचा धक्का बसला . त्याने आता या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आणि आ. मेहतां विरोधात तक्रार नोंदवून घ्यावी व आपणास न्याय द्यावा असे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यां कडे केले आहे . तर वरिष्ठ पोलीस अधिकारी भाईंदर पोलिसांवर कारवाई करणार का ? असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत.