मिरा रोड : येणाऱ्या पुणे व धाराशिव येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी भाईंदरच्या श्री गणेश आखाड्यातील ९ पैलवानांची निवड झाली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातून ७, पालघर जिल्ह्यातून ३ व रत्नागिरी जिल्ह्यातून १ पैलवान चा समावेश आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा निवड चाचणी भिवंडीच्या सोनाळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी पार पडली. या कुस्ती स्पर्धेमध्ये श्री गणेश आखाड्यातील विशाल माटेकर, सूरज माने, ओम जाधव, गणेश शिंदे, सूर्यकांत देसाई या पैलवानांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झाली.
पालघर जिल्हा निवड चाचणी मध्ये परवेश यादव, लोरिक यादव व चिराग पाटील तर रत्नागिरी जिल्हा निवड चाचणीत अतुल घराते यांची निवड झाली आहे. भिवंडी येथील चाचणी स्पर्धेत सूरज माने याने ७९ किलो वजनी गटा मध्ये सूर्यकांत देसाई याने ८६ किलो वजनी गटामध्ये तर विशाल माटेकर याने ९२ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. प्रौढ गट माती विभागात गणेश शिंदे याने ७० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पैलवानांची निवड पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता करण्यात आली आहे अशी माहिती आखाड्याचे संस्थापक वसंत पाटील यांनी दिली.