वाडा : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अचानक आलेल्या वीजा, वादळ व मुसळधार पावसामुळे शहरातील वीज पुरवठ्यात अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्याने गेले पंधरा दिवस कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार तो खंडीत होणे आदी समस्यांचा जाब शिवसैनिकांनी उपतालुका प्रमुख तुषार यादव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला विचारला वाडा उपविभागाचे उप अभियंता डी. आर. वट्टमवार यांनी वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.मीनाताई ठाकरे नगर, पेठरांजणी भागातील ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने महामंडळाने इतर ठिकाणाहून वीज पुरवठा दिल्याने कमी अधिक प्रमाणात वीजपुरवठा होत होता त्यामुळे ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होऊ लागली व वारंवार वीज पुरवठा खंडीत होत होता. या शिवाय शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत होता. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी थेट महावितरण कार्यालयात धडकले व जाब विचारला.याबाबतीत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना येत्या दोन दिवसात ट्रान्सफार्मर बसवून शहरातील वीज पुरवठा सुरळीत व नियमित करण्याचे आश्वासन उप अभियंता वट्टमवार यांनी दिले. यावेळी उपशहर प्रमुख निलेश पाटील, तुषार भानुशाली, श्रीकांत आंबवणे, भरत थोरात, रोहिदास पाटील, कुणाल पाटील आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
सेनेने महावितरणला विचारला जाब, वीजपुरवठा सुरळीत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:16 AM