अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या वडवली येथील शिव मंदिर तलावाची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. लोकसहभागातून या तलावातील गाळ काढण्यात आल्यावर आता या तलावात पुन्हा प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोबत, या तलावाशेजारी असलेल्या ओढ्यामध्ये स्वतंत्र गणेश विसर्जनघाट तयार करून तलाव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वडवली गावाजवळील शिव मंदिर तलावातील गाळ काढण्यासाठी दोन वर्षे काम सुरू होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून ८० लाखांपेक्षा जास्तीचा निधी गोळा करण्यात आला. त्यातूनच या तलावातील गाळही निघाला. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करून या कामात हातभार लावला होता. काम मोठे असल्याने ते करण्यासाठी दोन वर्षे उलटली. जून २०१९ मध्ये हे काम पूर्ण करून तलाव भरण्यास सुरुवात झाली. पावसामुळे यंदा हा तलाव जुलै महिन्यातच भरून वाहू लागला. या तलावाच्या खाली आता १५ फूट जागा झाली असून त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी या तलावात निर्माल्य उघड्यावर टाकण्यात येत होते. सोबत, गणपती आणि देवीच्या मूर्तीचे विसर्जन याच तलावात करण्यात येत होते. त्यामुळे तलावात प्लास्टर आॅफ पॅरिसचा मोठा थर तयार झाला. विसर्जनामुळे तलावात प्रदूषण वाढत असल्याने यंदा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या पुढाकाराने आता तलावाशेजारी वाहणाऱ्या ओढ्यामध्ये विसर्जनकुंड तयार करण्यात आले आहे. या ओढ्यातील स्वच्छ पाणी अडवण्यात आले असून या पाण्याची खोली सात फूट करण्यात आली आहे. त्यामुळे येथे लहानमोठे अशा दोन्ही प्रकारच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सहजपणे केले जाते. तलावाचा एक भाग अंबरनाथ पालिकेत असून उर्वरित भाग बदलापूर पालिकेचा आहे. बदलापूर पालिका हद्दीतील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विसर्जन घाट तयार करून तलावाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.स्वच्छतेसाठी तरुणांनी घेतला पुढाकारतलावाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. सोबत विजेची व्यवस्था, बाकडे, पेव्हरब्लॉक लागून या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शेजारी असलेल्या तलावाच्या मध्यभागी महादेवाची मूर्ती बसवण्यात आली असून त्याला रोषणाई करण्यात आली आहे. आज या तलावाच्या सौंदर्यात भर पडली असून हा तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी याच भागातील तरुण मंडळी एकत्र आली आहे.