मीरारोड - प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कंटेनर आदींवर बंदी असताना देखील महापालिका मुख्यालया शेजारीच सदानंद ह्या बड्या हॉटेलातून अतिरिक्त आयुक्तांनी मागवलेले जेवण चक्क बंदी असलेल्या प्लास्टिक कंटेनर आणि प्लास्टिक पिशवीतून दिले. त्यामुळे हॉटेलवर सोमवारी १० हजार रुपयांचा दंड आकारात ३२ किलो बंदी असलेल्या प्लास्टिक कंटेनर - पिशव्यांचा साठा पालिकेने जप्त केला आहे.
राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारने देखील एकल वापराच्या प्लास्टिक पिशव्या, कंटेनर, ग्लास, चमचे आदी विविध वस्तूंवर बंदी घातलेली आहे. राज्य शासनाच्या अधिनियम नुसार बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंचा वापर, विक्री वा साठा आढळून आल्यास दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच गंभीर नसल्याने कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शहरात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य वस्तूंचा सर्रास वापर - विक्री सुरु आहे.
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी गेल्या आठवड्यात डबा आणला नव्हता म्हणून पालिका मुख्यालया शेजारी असलेल्या सदानंद हॉटेल मधून जेवण मागवले होते. मात्र हॉटेल चालकाने बंदी असलेल्या प्लास्टिक कंटेनर मधून गरम गरम जेवण दिले व त्या कंटेनर साठी बंदी असलेली प्लास्टिक पिशवी दिली.
डॉ. पानपट्टे यांना प्लास्टिक खूप घातक असल्याचे तसेच प्लास्टिक मधून गरमा गरम खाद्य पदार्थ वा जेवण घेणे म्हणजे अगदी कर्करोग पर्यंतच्या आजाराला ते कारणीभूत असल्याची कल्पना आहे. त्यातच त्यांनी पिशवी हि प्लॅस्टिकची आहे कि कसे ? हे पाहण्यासाठी ती जाळून पाहिली असता बंदी असलेल्या प्लॅस्टिकची असल्याचे खात्री झाली.
त्यांनी सदानंद हॉटेल वर कारवाईचे निर्देश स्वच्छता निरीक्षक श्रीकांत धीवर यांना दिले. धीवर यांनी तात्काळसदानंद हॉटेल वर छापा टाकून तपासणी केली असता बंदी असलेले ३० किलो प्लास्टिक कंटेनर आणि २ किलो बंदी असलेल्या पिशव्यांचा साठा सापडला. धीवर यांनी हॉटेल चालकास १० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला.