वसई : भाजपा युवा मोर्चा अध्यक्षांसह सात जणांना वालीव पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तिच्या निषेधार्थ भाजपाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तुंगारेश्वर येथे दोन गटात मारामारी सुरू होती. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना वालीव पोलीस ठाण्यात आणले. ते भाजपाचे पदाधिकारी होते. त्यात युवा मोर्चाचा अध्यक्ष रणजीत ईश्वर दयाल सिंग याचा समावेश होता. मात्र आम्हाला पोलीस ठाण्यात का आणले? असा सवाल करत या सात जणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि बाचाबाची केली. यामुळे पोलिसांनी या सातही जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. या सर्वांना न्यायायलयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
या घटनेनेमुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा नेला. आमच्या सात कार्यकर्त्यांना वीस पोलिसांनी कोठडीत अमानुष मारहाण केली. समोरच्या गटातील लोकांवर कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. आता पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.