ठाणे : ट्रेन उशिरा धावल्यामुळे प्रवाशाला झालेला त्रास आणि ट्रेन उशिरा असूनही ती वेळेतच होती, असे खोटे उत्तर देणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ७ हजारांचा दंड आकारला आहे.नवी मुंबई येथे राहणारे गोपाल बजाज यांनी २२ मार्च २०१३ रोजी ठाणे येथून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आॅनलाइन पेमेंटद्वारे नागपूर-सीएसटी ट्रेनची तिकिटे बुक केली. ५ मे २०१३ रोजी सायंकाळी ७.४० ही ट्रेनची वेळ होती. ट्रेन पकडण्यासाठी बजाज हे अमरावती येथे पोहोचले असता ट्रेन सुमारे ४ तास ३० मिनिटे उशिरा असल्याचे समजले. बजाज यांना दुसऱ्या दिवशी आॅफिसला वेळेत पोहोचायचे असल्याने त्यांनी दुसऱ्या ट्रेनचे १८० रुपयांचे तिकीट काढून जनरल क्लासने प्रवास केला. त्यानंतर, बजाज यांनी ट्रेन उशिरा असल्याबाबत ई-मेलद्वारे इंडियन रेल्वेला कळवून भरलेल्या तिकिटाचे ३०० रुपये परत मागितले.इंडियन रेल्वेच्या मॅनेजिंग डायरेक्टरने २३ मे २०१३ रोजी ट्रेन नेहमीच्या वेळेत चालत होती, असे बजाज यांना सांगितले. मात्र, बजाज यांनी माहितीच्या अधिकाराखाली रेल्वेचे तेव्हाचे वेळपत्रक मिळवून ५ मे ला ट्रेन उशिरा म्हणजे रात्री १२.२५ ला पोहोचल्याचे दाखवले. त्यामुळे रेल्वेने खोटे सांगितले, असे मंचाने स्पष्ट केले. तर, आपण ही तक्रार मंचात दाखल केल्यावर रेल्वेने तिकिटाचे ३०० रुपये दिल्याचे बजाज यांनी त्यानंतरच्या युक्तिवादात नमूद केले आहे. रेल्वेने तिकिटाचे पैसे परत देऊन ट्रेन नियोजित वेळेपेक्षा सुमारे ५ तास लेट झाल्याचे मान्य केले आहे. त्यावरून, रेल्वेने बजाज यांना सदोष सेवा दिली असून तिकीट आणि माहितीच्या अधिकाराचा खर्च ३३० रुपये १२ टक्के व्याजाने द्यावा. तसेच नुकसानभरपाई आणि न्यायिक खर्च मिळून ७ हजार द्यावे, असे आदेश रेल्वेला ग्राहक मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
लेट रेल्वेला सात हजारांचा दंड
By admin | Published: September 15, 2016 2:08 AM