वसई : पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे. राहूल बोस आणि मंदिरा बेदी स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसडर आहेत.यंदाच्या शर्यतीत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ६४० धावपटू सहभागी होणार असून त्यात भारतातील सर्वोत्तम धावपटू असलेले रशपाल सिंग, पंकज धाका, सनातन सिंग, भरत प्रकाश, अनु सथ्यादास, जी. बी. पाटले, कालिदास हिरवेवर, प्रदीप सिंग, मानसिंग, गोविंद सिंग, चंद्रकांत मानवडकर, सावहीन पाटील यांचा समावेश आहे. तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारतातील आघाडीच्या स्वाती गाढवे, मोनिका आथरे, मोनिका राऊत, मिनाक्षी पाटील, मनीषा साळुंखे या धावपटू धावणार आहेत.पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन विजेत्याला अडीच लाखाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.स्पर्धेत अनेक अधिकारीही धावणार आहेत. यामध्ये अनुप कुमार सिंग, मंजुनाथ सिंगे, जयंत बजबळे आदी पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे. तर उपजिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते हेही धावणार आहेत.अर्ध मॅरेथॉनमध्ये चार हजारांहून अधिक हौशी धावपटू धावणार आहेत. ११ किलोमीटरच्या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर ज्युनियर शालेय वयोगट शर्यतीत चार हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.बॅटल रन स्पर्धा मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असून यंदा यात ३१ संघ अर्धमॅरेथॉन आणि पाच किलोमीटर डॅशमध्ये सहभागी झाले आहेत. संघातील सदस्यांच्या एकत्रित वेळेवरून विजेता संघ निवडण्यात येणार आहे. अर्ध मॅरेथॉन बॅटल रनमधील सर्वोत्तम रनिंग क्लबला दीड लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला ९० हजार रुपये आणि तृतीय संघाला ६० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.विशेष मॅरेथॉन ट्रेन : मॅरेथॉनसाठी परेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. चर्चगेट स्थानकातून ही ट्रेन पहाटे ३ वाजता सुटेल. ही ट्रेन वसईला पहाटे ४.२३ आणि विरारला पहाटे ४.३१ वाजता पोचेल. स्पर्धेच्या ठिकाणी पोचण्यासाठी वसई स्टेशन व विरार स्टेशन येथून वाहतूकीची व्यवस्था आहे.
रविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:16 AM